esakal | कोल्हापूरला मोठा दिलासा! पूरबाधित 129 गावांत ‘हायटेक दवंडी’
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूरला मोठा दिलासा! पूरबाधित 129 गावांत ‘हायटेक दवंडी’

कोल्हापूरला मोठा दिलासा! पूरबाधित 129 गावांत ‘हायटेक दवंडी’

sakal_logo
By
लुमाकांत नलावडे

कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरबाधित गावांत आता हायटेक दवंडी दिली जाणार आहे. धोक्याचे इशारे, संदेश एकाच वेळी सर्वांना पोचविण्यासाठी जिल्ह्यातील १२९ पूरबाधित गावांत सार्वजनिक उद्‍घोषणा प्रणाली संच (जीएसएम प्रणाली) (GSM system) बसविण्यात येत आहे. पूर्वी गावोगावी दवंडी दिली जात होती, अशाच पद्धतीने आता जीएसएम प्रणालीनुसार एकाच ठिकाणी असलेल्या ध्वनिवर्धकावरून संपूर्ण गावाला सूचना दिल्या जातील. (Hi-tech-129-flood-hit-villages-GSM-system-flood-alert-contact-notification-akb84)

(Telebu Communications, a Hyderabad based company)तेलेबू कम्युनिकेशन या हैदराबादच्या कंपनीकडून हे काम करण्यात येत असून, जुलैअखेर हे सर्व कामकाज पूर्ण होणार आहे. यामुळे पूरस्थिती वेळीच नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल. जिल्ह्यातील पूरबाधित गावांसाठी हा पहिलाच प्रयोग आहे. गेल्या वर्षी आणि यापूर्वी झालेल्या पूरस्थितीत पूरग्रस्तांना किंवा नागरिकांना संपर्क साधणे अशक्य झाले होते. या प्रणालीमुळे ते शक्य होणार आहे.

अतिवृष्टी, पूरस्थितीत किंवा आपत्कालीन स्थितीत अनेकदा संबंधित यंत्रणेकडे संपर्क साधणे अशक्य होते. मोबाईलचे नेटवर्क मिळत नाही. लॅन्डलाईनच्या केबल तुटल्यास त्याचा वापर होत नाही. अशा वेळी जीएसएम प्रणाली उपयुक्त ठरते. सॅटेलाईटद्वारे ही यंत्रणा कार्यान्वित ठेवली जाते. एकाच ठिकाणाहून अनेक ठिकाणी एकच सूचना देता येते. किंबहुना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी सूचना देण्यासाठी जीएसएम प्रणालीचा वापर होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील पूरस्थितीत संबंधित गावकऱ्यांना संपर्क साधण्यासाठी ही यंत्रणा सध्या बसविण्यात येत आहे.

हेही वाचा: कोल्हापुरात धुवांधार; 14 बंधारे पाण्याखाली

गाव, तालुक्याचे ठिकाण, ग्रामपंचायतीचा परिसर, शहरातील मध्यवर्ती वस्ती अशा ठिकाणी ही जीएसएम प्रणाली बसविल्याने त्या भागातील नागरिकांना सूचना देणे सहज शक्य होणार आहे. ज्या ठिकाणी पोचता येत नाही, त्या ठिकाणीही सूचना या प्रणालीनुसार देता येणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी ही प्रणाली बसविण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना तहसील आणि प्रांताधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पूरस्थितीत तेथील गावकऱ्यांना तहसील कार्यालयातून सूचना देणे सोपे जाणार आहे. तेथे प्रत्यक्षात न जाता या सूचना जीएसएम प्रणालीद्वारे देता येतात. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ही व्यवस्था करण्यात आली. पूरबाधित गावांत पहिल्यांदाच हा प्रयोग होत आहे.

- प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

तालुकानिहाय पूरबाधित गावे अशी

हातकणंगले २१

शिरोळ ३७

करवीर २४

राधानगरी ११

पन्हाळा १०

शाहूवाडी ०५

गगनबावडा ०७

भुदरगड ०३

एकूण १२९

loading image