esakal | १८०० व्यापारी हतबल IKolhapur
sakal

बोलून बातमी शोधा

१८०० व्यापारी हतबल

१८०० व्यापारी हतबल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर ः जागोजागी लावलेले बॅरिकेड्स, दुचाकींना असणारी बंदी यामुळे भाविक महाद्वार, ताराबाई रोड, जोतिबा रोड येथे येत नाहीत. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील या व्यापारी पेठांत नवरात्रोत्सवातील ग्राहक, भाविक रस्त्यावर येत नाहीत. नवरात्रोत्सवाच्या काळात एक हजार ८०० व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसल्याचे चित्र आहे. प्रशासनाने निर्बंध शिथिल केले असे भासविले. मात्र, प्रत्यक्षात भाविक रस्त्यावर येऊच शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे.

अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकाला शिवाजी चौकातच अडवले जाते. तेथून त्याची रांग सुरू होते. दर्शन झाल्यावरही गाडी दूर लावावी लागत असल्याने तो बाजारात न फिरता गाडी घेऊन घरी जाण्याला प्राधान्य देतो. परगावचे भाविक तर आपल्या वेळेत दर्शन घेतात. इकडे तिकडे फिरण्यासाठी अडथळे असल्याने मुक्कामाच्या ठिकाणी निघून जातात. परगावचे आणि स्थानिक भाविक व्यापारी पेठांमधील रस्त्यावर येऊच शकत नाहीत. दुचाकींना या सर्व रस्त्यांवरून येऊ दिले असते तर कदाचित ग्राहकांनी बाजारपेठ फुलली असती. कोरोनामुळे गेली दोन वर्षे व्यापारी, फेरीवाले अडचणीत आहेत. नवरात्रोत्सवातील व्यवसाय हा वर्षभरातील मोठा कमाईचा भाग असतो; पण ग्राहक दुकानापर्यंत पोहचूच शकत नसल्याने व्यवसाय ठप्प आहे. प्रशासनाने कोणालाही विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने निर्णय घेतले. त्यामुळे व्यावसायिक पुन्हा एकदा आर्थिक गर्तेत गेले आहेत.

आधारकार्ड नसल्याने जोतिबाचे कळस दर्शनच

कोरोनामुळे बंद असलेले दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचे मंदिर काल (ता. ७) तब्बल आठ महिन्यांनी उघडण्यात आले. या वेळी ग्रामस्थ, भाविकांनी ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा जयघोष केला; पण ई-पास पद्धतीने दर्शन असल्याने कालपासून अनेक भाविक गोंधळून गेले आहेत. नेटवर्क कमी-जास्त होत असल्याने यंत्रणा हळूहळू सुरू होती. परिणामी, भाविकांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागले.

अनेक वयोवृद्ध भाविकांनी आधारकार्ड आणले नसल्याने त्यांना केवळ कळस दर्शनावरच समाधान मानून घरी परतावे लागले. लहान मुलांना प्रवेश नसल्याने त्यांना पार्किंगच्या ठिकाणी थांबवावे लागले. ई-पास दर्शन पद्घतीने भाविक संतप्त झाले असून, ही पद्धत बंद करण्याची मागणी होत आहे.

जोतिबा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पहाटेपासून ते रात्री एक या वेळेत नियम व अटींचे पालन करून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. काल मध्यरात्री दोनलाच काही भाविकांचे आगमन झाले. या वेळी ई-पास काढलेले सांगली जिल्ह्यातील धनंजय उदय साळुंखे यांना पहिला लाभ मिळाला. कोणतेही धार्मिक विधी, होमहवन पूजा, अभिषेक भक्तांना करता येणार नाहीत. भाविकांना कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळणे बंधनकारक आहे.

हेही वाचा: के.व्ही.सुब्रमण्यम मुख्य आर्थिक सल्लागार पदाचा देणार राजीनामा

मंदिराचे अर्थकारण

  • अंबाबाई मंदिराभोवती व्यापारी पेठ

  • नवरात्रोत्सव त्यांना मोठा व्यवसाय देतो

  • यंदा व्यवसाय ७० ते ८० टक्क्यांनी घटला

  • परिसरातील लहान-मोठे व्यापारी- ८००

  • फेरीवाले- १०००

छोट्या फेरीवाल्यांपासून आलिशान सराफी दुकानांपर्यंत सर्वच या काळात आपापल्या परीने व्यवसाय करतात.

हॉटेल, यात्री निवास अडचणीत

मंदिर परिसरात मोठ्या संख्येने यात्री निवास आणि हॉटेल आहेत. परगावहून येणारे भाविक यात्री निवासात मुक्काम करतात. मात्र, यंदा चारचाकी किंवा दुचाकीला प्रवेश नसल्याने परगावच्या भाविकांनी अन्य ठिकाणी असलेल्या यात्री निवासात थांबणे पसंत केले. त्यामुळे मंदिर परिसरातील हॉटेल, यात्री निवास यांचा व्यवसाय थांबला. ज्यांनी भाड्याने जागा घेऊन व्यवसाय सुरू केला आहे, त्यांची अवस्था दयनीय आहे.

"दुकानदारांना घरफाळा, घरभाडे, वीजबिल भरावे लागते. नवरात्रोत्सवाचा व्यवसाय डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी पदरमोड करून आर्थिक जोडणी केली होती. मात्र, प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे ९० टक्के व्यवसाय बुडाला. आधीच लॉकडाउनमुळे आर्थिक अडचणीत असणारे व्यावसायिक आता आणखीनच अडचणीत आले आहेत. पुढील महिन्याचे भाडे कसे भरायचे, हा प्रश्न आहे."

- विवेक वोरा, व्यावसायिक, राजाराम रोड

"नवरात्रोत्सवात परगावाहून येणारा भाविक हा व्यवसायाचा आधार असतो. स्थानिक भाविकही खरेदी करण्यासाठी महाद्वार रोड व परिसरात येतो. यंदा प्रशासनाने वाहतुकीचे जे नियोजन केले आहे, त्यामुळे भाविक महाद्वार रोडवर येतच नाहीत. त्यामुळे होणारा ७० टक्के व्यवसाय ठप्प आहे."

- जयंत गोयानी, कार्याध्यक्ष, महाद्वार रोड व्यापारी असोसिएशन

loading image
go to top