...आणि खानविलकरांचे मंत्रिपद गेले

लोकसभेची १९९९ ची निवडणूक स्वतंत्रपणे लढलेल्या काँग्रेस व त्यावेळच्या राष्ट्रवादी काँग्रेसने २००४ ची निवडणूक एकत्रित लढवली. त्यावेळी राज्यात दोन्ही काँग्रेसचे सरकार होते, तर विरोधात सेना-भाजप युती होती.
 digvijay khanvilkar
digvijay khanvilkarSakal

लोकसभेची १९९९ ची निवडणूक स्वतंत्रपणे लढलेल्या काँग्रेस व त्यावेळच्या राष्ट्रवादी काँग्रेसने २००४ ची निवडणूक एकत्रित लढवली. त्यावेळी राज्यात दोन्ही काँग्रेसचे सरकार होते, तर विरोधात सेना-भाजप युती होती. समोर तगडे आव्हान असल्याने लोकसभेच्या २००४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक फतवा काढला.

ज्या मंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघात लोकसभेच्या उमेदवाराला कमी मते मिळतील त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाईल. याचा फटका कै. दिग्विजय खानविलकर यांना बसला. कै. खानविलकर यांचे मंत्रिपद जाणे ही घटना त्यांच्या राजकीय जीवनात ‘टर्निंग पॉईंट’ ठरली.

स लग २५ वर्षे करवीरचे आमदार, त्यात पाच वर्षे राज्यमंत्री आणि शेवटची साडेचार वर्षे आरोग्यमंत्री अशी देदीप्यमान कारकीर्द कै. खानविलकर यांची राहिली. त्यांना पराभूत करण्यासाठी दिग्गजांनी त्यांच्या विरोधात शड्डू ठोकला; पण ग्रामीण भागातील जनतेशी नाळ जुळलेला नेता, तळागाळातील कार्यकर्त्यांचा त्यांच्याकडून होणारा सन्मान या जोरावर सलग पाचवेळा करवीरमधून निवडून येण्याची किमया त्यांनी साधली.

१९९९ ची विधानसभा निवडणूक दोन्ही काँग्रेसने स्वबळावर लढवली. त्याचवर्षी राष्ट्रवादीची स्थापना झाल्याने आघाडी होऊ शकली नाही. या निवडणुकीतच काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी, यासाठी आताचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील प्रयत्नशील होते;

पण त्यांच्याऐवजी पक्षाने काँग्रेसचे माजी राज्यमंत्री कै. श्रीपतराव बोंद्रे यांचे पुत्र कै. चंद्रकांत यांना उमेदवारी दिली. काटाजोड झालेल्या या लढतीत कै. खानविलकर यांनी बाजी मारली. त्याची बक्षिसी म्हणूनच शरद पवार यांनी त्यांना राज्याचे आरोग्यमंत्री केले.

या मंत्रिपदाच्या जोरावर कै. खानविलकर यांनी जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात जे काम केले त्याला आजही तोड नाही. किंबहुना त्यांनी आरोग्य क्षेत्रात केलेल्या प्रचंड कामामुळे तुम्ही फक्त कोल्हापूरचे नव्हे, तर राज्याचे मंत्री आहात, असे चेष्टेने त्यांना सांगण्याची वेळ आली एवढे मोठे काम त्यांनी करून दाखवले.

त्यात छत्रपती प्रमिलाराजे रुग्‍णालयाचा कायापालट करताना या रुग्णालयात हृदय शस्त्रक्रिया विभाग सुरू केला. त्यानंतर डोळ्याचे प्रसिद्ध डॉ. तात्याराव लहाने यांना आणून डोळ्यांच्या मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया केल्या.

एवढेच नव्हे, तर कोल्हापुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे सुरू झाले. आज या महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवला जातो. त्यांनी केलेल्या या कामामुळेच आज वैद्यकीय क्षेत्रात जिल्ह्याची मोठी प्रगती झाली आहे. त्यांच्यानंतर या विभागाकडे फारसे कोणी लक्ष दिले नसले तरी त्यांनी केलेल्या कामामुळे अनेक रुग्णांचे जीव वाचले.

१९९९ मध्ये विधानसभेची संधी हुकल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी त्याच वर्षापासून विधानसभेची तयारी सुरू केली. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना आपली ताकद दाखवण्याची संधी मिळाली. कोल्हापूर लोकसभेची जागा आघाडीत राष्ट्रवादीकडे गेल्यानंतर कै. सदाशिवराव मंडलिक यांनाच पुन्हा पक्षाने संधी दिली.

त्यांच्या विरोधात सुरुवातीला उमेदवारही नव्हता; पण ऐनवेळी शिवसेनेकडून खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी मिळाली. देशात काँग्रेस आघाडीचे सरकार यावे यासाठी राज्य व देश पातळीवरील नेते प्रयत्नशील होते. त्यातून ज्या मंत्र्यांच्या मतदारसंघात लोकसभेच्या उमेदवाराला मताधिक्य मिळणार नाही, त्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल, असा फतवा पवार यांनी काढला.

२००४ च्या लोकसभेचे निकाल लागले. त्यात कै. मंडलिक अवघ्या १४ हजार मतांनी विजयी झाले; पण करवीरमधून त्यांच्यावर तब्बल ४२ हजार मतांचे मताधिक्य होते. करवीरमधून कै. मंडलिक यांना मते कमी पडल्याने कै. खानविलकर यांनी लगेच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील मोठा ‘टर्निंग पॉईंट’ ठरला.

त्यानंतर २००४ च्या विधानसभेत त्यांचा पराभव झाला. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कोल्हापूर दक्षिणमधून नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला; पण त्यातही त्यांना यश आले नाही; पण त्यांनी कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कामामुळे आजही त्यांचे नाव अजरामर आहे, एवढे निश्‍चित.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com