Belgaon : ३५ आजी-माजी ग्रामपंचायत सदस्यांची चौकशी होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchayats

Belgaon : ३५ आजी-माजी ग्रामपंचायत सदस्यांची चौकशी होणार

बेळगाव- बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या अखत्यारित बांधकामासंदर्भात नियमबाह्य ठराव आणि परवानगीबाबत जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या तक्रारीवर प्रादेशिक आयुक्त कार्यालयात मंगळवारी (ता. ७) सुनावणी होणार आहे. यासाठी बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या ३५ आजी-माजी सदस्यांना हजर राहण्याचे आदेश बजाविण्यात आले आहेत.

प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांनी २७ जानेवारी २०२३ रोजी दिलेल्या आदेशात, चौकशीला उपस्थित राहण्याची सूचना केली आहे. शिवाय जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कर्नाटक ग्रामस्वराज्य, पंचायत राज अधिनियम १९९३ आणि दुरुस्ती अधिनियम २०२० प्रकरण ४३ (अ) व ४८ अन्वये ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आलेला ठराव आणि बांधकामासाठी दिलेली परवानगी यासंदर्भात प्रादेशिक आयुक्त कार्यालयात ८ नोव्हेंबर २०२१ रोजी तक्रार दाखल केली आहे.

यानुसार ग्रामपंचायतीच्या ३५ सदस्यांना १४ डिसेंबर २०२१ रोजी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्यात आली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता कार्यालयामध्ये आजी-माजी सदस्य आणि अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीला न चुकता उपस्थित राहावे. हजर राहताना संबंधीत कागदपत्रे आपल्यासोबत घेऊन यावीत, असा उल्लेख करण्यात आला आहे.

तसेच यादिवशी विस्तृत माहिती देण्यासाठी जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाकडून अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत सूचना बजाविल्या आहेत. तालुका पंचायत आणि ग्रामपंचायतीचे पंचायत विकास अधिकारी यांनाही दाखल्यांसह हजर राहण्याबाबत आयुक्तांनी कळविले आहे.