esakal | आजऱ्यात वाहनधारकांवर कारवाईचा बडगा
sakal

बोलून बातमी शोधा

आजऱ्यात वाहनधारकांवर कारवाईचा बडगा

आजऱ्यात वाहनधारकांवर कारवाईचा बडगा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आजरा: शहरात गणेशोत्सवात तर बाजारपेठत वाहतूक ठप्प होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये नो पार्किंग झोनमध्ये बिनधास्तपणे वाहने लावण्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या वाहतूक पोलिसांची व नगरपंचायतीची डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे पोलिसांनी आज नो पार्किंग झोनमध्ये गाड्या लावलेल्यांवर कारवाईचा बडगा उचलला. त्यांच्याकडून दंड वसुल केला.

हेही वाचा: गडहिंग्लज: गौरी गणपती विसर्जनासाठी २२ कृत्रिम कुंड

आजरा शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. वाहतूक समस्यांमध्ये भरच पडत आहे. यामध्ये अरुंद रस्ते, वाहनतळ नसणे, रहदारीत वाढ ही कारणे आहेत. त्याचबरोबर रस्त्यावर अस्ताव्यस्त लावलेल्या दुचाकी व चारचाकी गाड्यांमुळे वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळे येत आहेत. सध्या गणेशोत्सव सुरु आहे.

या काळात शहरात वाहतूक ठप्प होण्याचे प्रमाण वाढले आहे. या अनुषंगाने आज आजरा पोलिस वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला. आजरा पंचायत समिती ते आजरा डिझेल व पेट्रोलपंप या प्रमुख मार्गावर विनाकारण वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनधारकांवर आजरा पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.

ही वाहने नो पार्किंग झोनमध्ये असल्याने वहातुकीला अडथळा निर्माण करीत होती. पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईमुळे अनेक वाहनधारकांनी वाहनासह काढता पाय घेतला. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक सुरळीत झाली. पोलिसांनी कारवाईमध्ये सातत्य राखल्यास आजऱ्यात वहातुक कोंडी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया नागरीकांतून व्यक्त होत होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिस विशाल कांबळे, विशाल पाटील व कर्मचारी सहभागी झाले होते.

अकरा चारचाकीसह दुचाकीवर कारवाई

"गणेशोत्सवानिमित्त आजरा बाजारपेठेत खरेदीसाठी शहरवासियांसह तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरीकांची गर्दी होत असल्याने शहरात वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. अकरा चारचाकीसह दुचाकीवर कारवाई केली आहे."

loading image
go to top