
Circuit Bench Finally Approved : चार दशकांतील संयम आणि चिकाटीचा अखेर आज विजय झाला. मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात मंजूर झाले. कोल्हापुरातील बैठका, मुंबईत मंत्रालयात बैठका, उच्च न्यायालयातील बैठकांचे वादळ उठत होते आणि कधी शमले कळतही नव्हते. पुन्हा अंगार फुलायचा आणि पुन्हा विझायचा. मात्र, तीन पिढ्यांनी सर्किट बेंचचा लढा सुरूच ठेवला. सातत्य ठेवले, संयम ठेवला, चिकाटी ठेवली आणि आनंदोत्सवही साजरा केला.
एखादी गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी संयम लागतो. चिकाटी लागते. हीच चिकाटी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांनी पिढ्यानपिढ्या ठेवली. प्रत्येक मुख्यमंत्री, राजकीय पक्ष निवडणुकांमध्ये कोल्हापुरात सर्किट बेंच करणार, असे आश्वासन देत होते. त्यानंतर वारंवार आंदोलने झाल्यानंतर मुख्यमंत्री भेटीसाठी मुंबईत बोलत होते. भेट होत होती. आशा पल्लवीत होत होत्या; मात्र पुढे काहीच होत नव्हते. मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायमूर्तींची भेट होत नव्हती. इन्फास्ट्र्क्चर नाही, असा मुद्दा पुढे येत होता. राज्याच्या मंत्रिमंडळात कोल्हापूरला सर्किट बेंच मिळावे, या ठरावासाठी आडकाठी होत होती. तरीही सहा जिल्ह्यांनी मोट कायम ठेवली. लढा सुरूच ठेवला.
एक दिवस असा होता की, आज सायंकाळी सर्किट बेंचला मंजुरी मिळणार इथंपर्यंत तयारी झाली. मात्र, तसा निर्णयच झाला नाही आणि वकिलांनी आक्रमक आंदोलन केले. आत्मदहनाचा प्रयत्न झाला. गुन्हे दाखल झाले. यानंतर सर्किट बेंच पुन्हा एकदा राज्यभर चर्चेत आले. यानंतर सर्किट बेंच मागणीसाठी असलेल्या शिष्टमंडळाला तत्कालीन मुख्य न्यायमूर्तींनी गोव्यात पणजी येथे भेटीस बोलावले होते. यापूर्वी मुंबईत होणारी बैठक गोव्यात झाली. वकिलांचा आक्रमकपणा तेथे शांत करण्यात आला. त्याचवेळी कोल्हापुरातच सर्किट बेंच होऊ शकते, असा अहवाल पुढे आला. तोच आज सर्किट बेंच प्रत्यक्षात आणण्यास मोलाचा ठरला.
सहा जिल्ह्यांच्या प्रगतीची मुहूर्तमेढ
अवघ्या काही दिवसांत सर्किट बेंचसाठी प्रत्यक्षात काम सुरू झाले. नोटिफिकेशन निघाले. सर्किट बेंच सुरू होणार ती तारीखही जाहीर झाली. प्रत्येक वेळी ठेवलेला संयम, आंदोलन, पाठपुराव्यातील सातत्य यांची चिकाटी आज वकिलांच्या पुढच्या पिढीला कोल्हापुरात ठेवण्यासाठी यशस्वी झाली. ज्या पक्षकारांना न्यायासाठी मुंबईला जाता येत नव्हते, त्यांना आता कोल्हापूरच्या उच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे. सर्किट बेंचमुळे कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांच्या प्रगतीची मुहूर्तमेढ रोवली गेली, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
आणि सर्किट बेंचच्या कामाला गती मिळाली
कोणते आंदोलन राहिले असे झाले नाही, आमची पुढची पिढी तरी कोल्हापुरातील सर्किट बेंचमध्ये काम करणार काय, अशी मरगळ आता ज्येष्ठांमध्ये आली होती. त्यामुळे तरुणांनी थेट मुंबई गाठली आणि तेथे ‘प्रॅक्टीस’ सुरू केली. कोल्हापुरात सर्किट बेंच होईल, ही आशा सोडून ज्येष्ठ वकिलांची मुले मुंबईत स्थायिक होऊ लागली. याचवेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई झाले आणि कोल्हापुरातील सर्किट बेंचच्या कामाला यापूर्वी कधीही गती मिळाली नाही इतकी गती मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.