esakal | कोल्हापूर शहरात बसणार हवा गुणवत्ता तपासणी यंत्र 

बोलून बातमी शोधा

 Air quality inspection machine to be installed in Kolhapur city

शहरातील हवेची गुणवत्ता सर्वांना समजावी. लोकांत हवा प्रदूषणाबाबत जनजागृती व्हावी. या उद्देशाने "कंटिन्युअस एँम्बियंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग मशिन' बसवले जाणार आहे.

कोल्हापूर शहरात बसणार हवा गुणवत्ता तपासणी यंत्र 
sakal_logo
By
ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : शहरातील हवेची गुणवत्ता सर्वांना समजावी. लोकांत हवा प्रदूषणाबाबत जनजागृती व्हावी. या उद्देशाने "कंटिन्युअस एँम्बियंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग मशिन' बसवले जाणार आहे. या यंत्रातील सेन्सर हवेतील प्रदुषके व अन्य वायूंचे प्रमाण मोजतो. हे प्रमाण यंत्राच्या डिजिटल स्क्रिनवर दिसते. हे यंत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बसवणार असून, त्यासाठी महापालिकेने जागा निश्‍चित करायची आहे. 
सध्या फुलेवाडी फायर स्टेशनच्या जागेचा प्रस्ताव दिला असून, लवकरच त्याला मंजुरी मिळेल. 
निरी संस्थेने 2018 मध्ये केलेल्या हवेच्या सर्वेक्षणानंतर हवा प्रदूषण अधिक असणाऱ्या शहरांची यादी प्रसिद्ध केली. यात कोल्हापूर शहराचाही समावेश होता. त्यानंतर महापालिकेने हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. त्यामुळे या परिस्थितीत काहीसा फरकही पडला, मात्र शहरातील वाढती वाहनांची संख्या, धूलिकणांचे वाढते प्रमाण यामुळे हवेच्या शुद्धतेसमोर अनेक आव्हाने आहेत. उन्हाळ्यातील तापमानवाढ हा चिंतेचा विषय आहे. 
"कंटिन्युअस एँम्बियंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग मशिन' हे अत्याधुनिक यंत्र असून, यामध्ये सेन्सर आहे. हा सेन्सर हवेतील प्रदुषके, तसेच अन्य वायू यांची मोजणी करतो. यंत्राच्या डिजिटल स्किनवर हे प्रमाण दर्शवतो. यामुळे त्या परिसरातील हवेची शुद्धता लक्षात येते. यातून नागरिकांना त्या परिसरातील हवेच्या गुणवत्तेची कल्पना येते. 

मध्यवस्तीत यंत्राची गरज 
महापालिकेने यासाठी फुलेवाडी फायर स्टेशनजवळची जागा निवडली आहे, मात्र या परिसरात शहराच्या मध्यवस्तीच्या तुलनेत हवा चांगली आहे. झाडी अधिक आहे. महापालिका चौक, गंगावेस, रंकाळा स्टॅंड या परिसरात वाहतुकीचे प्रमाण अधिक असल्याने धूलिकण व अन्य प्रदूषके अधिक आहेत. त्यामुळे या ठिकाणी यंत्र बसवणे आवश्‍यक आहे. 

प्रदूषण नियंत्रण मंडळ महापालिकेला हवा गुणवत्ता तपासणी यंत्र देणार आहे. यामुळे हवेच्या शुद्धतेचे प्रमाण सर्वांना कळेल. याशिवाय हवा प्रदूषणाच्या अभ्यासकांनाही मानवी हस्तक्षेपाशिवाय तपासलेला हवा शुद्धतेबाबतचा डाटा मिळेल. या सर्व दृष्टिकोनातून हे यंत्र उपयुक्त आहे. 
- समीर व्याघ्रांबरे, पर्यावरण अधिकारी, महापालिका