...आणि सुरू झाली "साप्ताहिक सुट्टी' 

... and the "weekly holiday" began
... and the "weekly holiday" began
Updated on

कोल्हापूर : सत्यशोधक विचारांच्या मुशीतून घडलेले कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या हक्क आणि न्यायासाठी सातत्याने लढे उभारून त्यांना न्याय मिळवून दिला. रविवारची सुटी देण्यास त्यांनी ब्रिटिश सरकार आणि गिरणीमालकांना भाग पाडले. 10 जून 1890 पासून रविवारची साप्ताहिक सुटी सुरू झाली. त्याला आज 130 वर्षे पूर्ण होत आहेत. विशेष म्हणजे आजच्या लोकशाही पद्धतीचा मार्ग लोखंडेंनी त्या काळात अवलंबून कामगारांना न्याय मिळवून दिला होता. 

अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचा केवळ धार्मिकच नव्हे सर्वच प्रकारच्या शोषणाला विरोध होता. त्यामुळे नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या अनिर्बंध शोषणाविरोधात आवाज उठवत त्यांचे हक्क, न्यायासाठी लढा उभारला. कामगारांना संघटित करून पीटिशन कमिशनपुढे साप्ताहिक सुटी, कामाच्या निश्‍चित वेळा, दुपारच्या जेवणाची सुटी, बालकामगार नको अशा कामगार हिताच्या मागण्या केल्या. लोखंडे हे कामगारांच्या आरोग्याबाबत दक्ष असत. कामगारांची कार्यक्षमता टिकून राहण्यासाठी त्यांना पुरेशी विश्रांती मिळणे आवश्‍यक आहे. 

पुरेशा विश्रांतीअभावी कामगारांचे आरोग्य बिघडते. त्यामुळे कामाच्या निश्‍चित वेळा आणि साप्ताहिक सुटी दिल्यास उत्पादनात वाढ होत असल्याचे अनेक संशोधनात्मक परदेशी दाखले लोखंडेंनी गिरणीमालक आणि सरकारला निवेदन आणि "दीनबंधू'पत्रातून लेखाद्वारे वारंवार दिले. तरीही साप्ताहिक सुटीस विरोध करण्यासाठी वेगवेगळी कारणे पुढे करण्यात आली. त्या कारणांची योग्य उत्तरे लोखंडेंनी देऊन गिरणीमालक आणि सरकारला निरुत्तर केले. तरीही साप्ताहिक सुटीची मागणी मोडत गिरणीमालकांनी रविवार हा ख्रिश्‍चनांचा वार आहे, असे धार्मिक कारण पुढे करून कामगारांमध्ये गैरसमज निर्माण करून त्यांची मने दूषित करण्याचा डाव आखला, मात्र लोखंडेंनी गिरणीमालकांची ही चाल ओळखून त्यांचा धार्मिक मुद्दा विवेकी पद्धतीने खोडून काढला. 

रविवार हा खंडोबा, कुलस्वामी देवतेचा वार आहे. बहुतांशी कामगार हे खंडोबाचे भक्त आहेत. असे अनेक दाखले देत लोखंडेंनी रविवार हा दिवस साप्ताहिक सुटीसाठी कसा योग्य आहे, हे सरकारला पटवून दिले. लोखंडे यांच्या मागणीला कामगारांचा वाढता पाठिंबा पाहून अखेर 10 जून 1890 मध्ये गिरणीमालकांनी रविवारच्या साप्ताहिक सुटीचा ठराव पास केला आणि कामगारांना साप्ताहिक सुटी लागू झाली. 

ब्रिटिशांवरही टीका 
लोखंडेंनी लढे उभारून न्याय मिळवून देताना कुठेही हिंसक मार्ग अवलंबिला नाही की कामगार दंगलीस प्रवृत्त होतील, असे कोणतेही कृत्य केले नाही. उलट कोणी तसा प्रयत्न केल्यास लोखंडेंनी जाहीररीत्या त्यांची कानउघाडणी केली. कामगारांच्या हक्क आणि न्यायाबाबत सरकारनेही चालढकल झाल्याने लोखंडेंनी ब्रिटिश सरकारवरही अनेकदा कडक शब्दांत "दीनबंधू'मधून टीका केली व त्यांना कर्तव्याची जाणीव करून दिली. त्यासाठी त्यांनी परिणामांची पर्वा कधीही केली नाही. 

दृष्टिक्षेप :
- नारायण लोखंडे यांनी कामगारांच्या हक्क, न्यायासाठी लढा उभारला 
- लोखंडे यांच्या मागणीला कामगारांचा वाढता पाठिंबा 
- 10 जून 1890 पासून रविवारची साप्ताहिक सुटी सुरू 
- लोखंडे हे कामगारांच्या आरोग्याबाबत दक्ष असत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pattankodoli ZP Member mahesh patil Caste Validity Certificate Cancelled
Shivaji Patil supports Shaktipeeth Highway project
Panchganga river drowning incident krushnat patil
Kolhapur Engineer End Life in kagal midc
Marathi News Esakal
www.esakal.com