नभांगणात नक्षत्रांचे तोरण; शंकर शेलार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arch of Nakshatras in Nabhangana Astronomer Shankar Shelar

नभांगणात नक्षत्रांचे तोरण; शंकर शेलार

सांगली : नभांगणात आयनिक वृत्तावर सध्या सूर्य, चंद्राच्या मार्गावर ग्रहगोलांनी ट्रॅफिक जाम केले आहे. नक्षत्रांचे तोरण तयार झाले आहे. सायंकाळी पश्चिमेला अलौकिक तेजःपुंज अशा नैसर्गिक ज्योतींचे हे तोरण पाहण्याची संधी मिळाली आहे, अशी माहिती खगोल अभ्यासक शंकर शेलार यांनी दिली.

ते म्हणाले, ‘‘आकाशात सायंकाळची शोभा आवर्जून पाहण्यासारखी आहे. डोळ्यांनी दिसणारे पाच, शिवाय दुर्बिणींमधून पाहावे लागणारे तीन असे आठही ग्रह सध्या सायंकाळच्या आकाशात दिसताहेत. दुग्ध-शर्करा योग असा, की चंद्रकोरही सध्या आकाशात या ग्रहमालेची शोभा वाढवीत आहे.

सायंकाळी सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर साधारण १५ ते २० अंशावर तेजस्वी शुक्र ग्रह आणि जवळच थोडा पूर्वेकडे छोटासा बुध ग्रह दिसत आहे. या जोडीच्या वर थोडी पूर्वेकडे नजर टाकल्यास मकर राशीत मंदप्रभ असा शनी ग्रह दिसेल. शनीच्या पूर्वेस जवळपास मध्यमंडलावर, मीन राशीमध्ये पाहिल्यास ठळक पांढराशुभ्र असा गुरू ग्रह आपले लक्ष वेधून घेईल.

गुरूच्या पूर्वेला रेवती नक्षत्रामध्ये नवमीचा अर्धा अधिक चंद्र व त्याच्याही पूर्वेस लक्षवेधी लालबुंद असा, तांबडा ग्रह मंगळ शोभून दिसत आहे. गगनाला गवसणी घालणारी ही नक्षत्रांची माळ अजून काही दिवस सायंकाळची शोभा वाढवताना दिसणार आहे. निसर्गप्रेमींनी हा अलौकिक खगोलीय नजारा जरूर नजरेत भरून घ्यावा, असे आवाहन श्री. शेलार यांनी केले आहे.

टॅग्स :Kolhapur