
कोल्हापूर, : कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तरी येथे कोणतीही वेगळी वागणूक मिळत नाही. बिनधास्त राहा, काही होणार नाही. याचा विश्वास देणारी व्हाईट आर्मीची टीम, हसत खेळत राहणारे सर्व रुग्ण, तोंडाला मास्क नाही की, सततच्या डॉक्टरांच्या औषधांच्या चिठ्ठ्यांचा माराही नाही, बिले डिपॉझिटचा तर येथे प्रश्नच नाही, अशा वातावरण जैन बोर्डिंग येथील व्हाईट आर्मीच्या कोविड केअर सेंटरमध्ये दोन महिन्यांत सुमारे 500 हून अधिक लोक उपचार घेऊन घरी गेले. कोरोनावर मात करण्यासाठी व्हाईट, आमींची सर्व टीम त्यासाठी दिवसरात्र कष्ट करत आहे.
निसर्गरम्य वातावण, झाडांच्या सावलीतलाच नैसर्गिक ऑक्सिजन देऊनच रुग्णांना बरे करण्याकडे या कोविड सेंटरमध्ये कल आहे. महापालिका, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन,जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, कोल्हापूर केमिस्ट असोसिएशन, रयत शिक्षण संस्था, दिगंबर जैन बोर्डिंग, कोल्हापूर प्रेस क्लब, कोल्हापूर जिल्हा प्रशासन, निहा व निमा असोसिएशन यांच्या संयुक्त सहकार्याने आणि व्हाईट आर्मीच्या पुढाकाराने हे कोविड केअर सेंटर सुरू आहे. शंभर बेड येथे उपलब्ध आहेत. चहा, नाष्टा, जेवणाची मोफत व्यवस्था आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, शेजारच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कर्नाटकातूनही येथे काही रुग्ण आले आणि उपचार करून बरे झाले. सकाळी योगासन, व्यायाम, प्राणायम, लिंबू, मध, शहाळे, वाफ, पिण्यासाठीही गरम पाणी देऊन रुग्णांची सेवा करण्यात व्हाईट आर्मीचे सर्व स्वंयसेवक, स्टाफ, नर्सेस सतत सज्ज असतात.
रुग्ण येताच, कोरोना झाला आहे, ही भीती पहिल्यांदा त्यांच्या मनातून काढून त्यांना मानसिक आधार दिला जातो. रुग्णालयासारखे कोणतेही वातावरण येथे नाही. त्यामुळे रुग्ण भयमुक्त होतात आणि आजूबाजूच्या रुग्णांकडे पाहून ते कसे व्यायाम करतात, कसा आहार घेतात, कसे एकमेकाशी बोलत बसतात. मनोरंजन करतात. हे पाहून सहजपणे नवे रुग्णही जुन्या रुग्णात मिसळतात, बघता बघता दहा दिवसांचा उपचार घेऊन घरी जातात. केंद्रासाठी डॉ. आबासाहेब शिर्के, डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ. शिरीष पाटील, डॉ. हर्षवर्धन जगताप, डॉ. विनायक शिंदे, डॉ. दीपक पवार, डॉ. प्रकाश संघवी, केमिस्ट असोसिएशनचे मदन पाटील, सीपीआरचे शानबाग, दिगंबर जैन बोर्डिंगचे संजय शेटे आदीचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे अशोक रोकडे यांनी सांगितले.
व्हाईट आर्मीच्या सेंटरमध्ये रुग्णांच्या मनातील भीती काढली जाते. भक्कम मानसिक आधार दिला जातो. उत्कृष्ट सकस आहार, व्यायाम आणि अशोक रोकडे आणि त्यांच्या टीमकडून दिले जाणारे मानसिक बळ यामुळे रुग्ण लवकर बरे होतात.
- हेमलता चव्हाण, कसबा बावडा
व्हाईट आर्मीच्या कोविड सेंटरमध्ये मोठा मानसिक आधार दिला जातो. त्यामुळे भयमुक्त आणि निसर्गरम्य वातावरणात येथे रुग्ण बरे होतात. मी आणि माझे पती पांडुरंग सुतार आम्ही येथेच बरे झालो. आमच्यावर मोफत उपचार झाले.
- पद्मावती सुतार
दोन महिने कोविड केअर सेंटर सांभाळणे आव्हान होते. पण सर्वाच्या सहकार्याने हे आव्हान व्हाईट आर्मीने पेलले आणि अनेक रुग्णांना मोफत बरे केल्याचे मोठे समाधान वाटते. यापुढेही ही सेवा अविरत सुरू केली जाईल. व्हाईट आर्मीचे सर्व जवान लोकांच्या सेवेसाठी नेहमीच सतर्क राहतील.
- अशोक रोकडे, अध्यक्ष, व्हाईट आर्मी.
संपादन ः यशवंत केसरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.