esakal | घरोघरी बाप्पांचे आगमन ; उद्या होणार प्रतिष्ठापना 
sakal

बोलून बातमी शोधा

Bappa's arrival from house to house; The installation will take place tomorrow

समृद्धीच्या पावलांनी गणेश चतुर्थीला घरी येणाऱ्या बाप्पांचे यंदा दोन-तीन दिवस अगोदरच घरोघरी स्वागत होत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने व कुंभार समाजाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मूर्ती नेण्यावर सोमवार (ता. 17)पासूनच कोल्हापूरकरांनी भर दिला आहे.

घरोघरी बाप्पांचे आगमन ; उद्या होणार प्रतिष्ठापना 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : समृद्धीच्या पावलांनी गणेश चतुर्थीला घरी येणाऱ्या बाप्पांचे यंदा दोन-तीन दिवस अगोदरच घरोघरी स्वागत होत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने व कुंभार समाजाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मूर्ती नेण्यावर सोमवार (ता. 17)पासूनच कोल्हापूरकरांनी भर दिला आहे. आजपासून गर्दी वाढत असली तरी कुंभार बांधवांनी नोंदणी केलेल्यांना विशिष्ट वेळा दिल्याने गर्दीवर नियंत्रण मिळविणे शक्‍य झाले. दरम्यान, सॅनिटायझर आणि मास्कचा वापर बंधनकारक असून, त्याची अंमलबजावणी होऊ लागली आहे. दरम्यान, शनिवारी (ता. 22) गणेश चतुर्थीदिनी घरोघरी मूर्तीची प्रतिष्ठापना होईल. 
आठवडाभर पावसाने शहर आणि जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. मात्र, आज सकाळपासून उघडीप दिल्याने बाजारपेठेला आजपासूनच खऱ्या अर्थाने उधाण आले आहे. पापाची तिकटी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी आदी परिसरात सजावटीचे साहित्य नेण्यासाठी गर्दी झाली असून, केवळ फोमचे बार वगळता पर्यावरणपूरक सजावटीवर सर्वांनीच भर दिला. कापडी, कागदी विविधरंगी फुले, मखरांसह सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. 

मुलींच्या हस्ते मूर्ती आगमन..! 
घरातील मुलींच्या हस्ते मूर्ती आगमनाची परंपरा यंदा अनेक कुटुंबांनी जपली आहे. तोंडावर मास्क असला तरी "बाप्पा मोरयाऽऽ'च्या गजरात आता बाप्पांचे घरोघरी आगमन होऊ लागले. काही तरुणांनी संपूर्ण गल्लीतील मिळून मूर्ती नेण्यावर भर दिला आहे. त्यासाठी एकच टेम्पो किंवा चारचाकी वाहन घेऊन ही मंडळी कुंभार गल्लीत येऊ लागली आहेत. प्रत्येक घरातील एक किंवा दोनच लोकांना घेऊन अशी वाहने कुंभार गल्ली परिसरात दिसू लागली आहेत. 

पारंपरिक वाद्ये नाहीच... 
गणेश चतुर्थीपूर्वी दोन दिवस अगोदर कुंभार गल्ली परिसरात विविध पारंपरिक वाद्ये हजेरी लावतात. मात्र, यंदा मोजक्‍याच लोकांना मूर्ती नेण्यासाठी प्रशासनाने आवाहन केले आहे. आगमन व विसर्जन मिरवणुकीवर प्रशासनाने बंदी घातली असल्याने पारंपरिक वाद्यपथकांचा गणेशोत्सवाचा हंगामही वाया जाईल. 

आज हरतालिका पूजन 
भाद्रपद तृतीयेला होणारे हरतालिका व्रत उद्या (ता. 21) होणार आहे. त्यासाठी हरतालिकेच्या छोट्या मूर्ती, पूजेसाठी विविध पाने, फुलांसह भाजी खरेदीसाठी आज बाजारपेठेत मोठी गर्दी राहिली. पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत महिला करतात. यानिमित्त विविध धार्मिक विधी घरी केले जातात. 

"दख्खनचा राजा' आला... 
दिलबहार तालीम मंडळातर्फे यंदा साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जाणार असून, आज मंडळाच्या पाच कार्यकर्त्यांनी बापट कॅम्प येथून मूर्ती आणली. चार फुटांपेक्षाही लहान ही मूर्ती असून, तालमीच्या साई मंदिरात या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. मोजक्‍याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्सवकाळात विविध धार्मिक विधी होतील. 


प्रत्येक वर्षी मूर्तीसाठी ठरलेली काही कुटुंबे आहेत. त्यांना अगोदरच मूर्ती घेऊन जाण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आजअखेर 70 ते 80 टक्के कुटुंबांनी मूर्ती नेल्या असून, उर्वरित मंडळी उद्या (ता. 21) मूर्ती नेतील. मुंबई पोलिस दलात कार्यरत नरेंद्र काटकर यांनी तर 3 ऑगस्टलाच मूर्ती घरी नेली आणि ते पुन्हा मुंबईत सेवेवर हजर झाले आहेत. 
- सर्जेराव निगवेकर, मूर्तिकार 

loading image
go to top