ई वॉर्डात चार टाक्‍यांसाठी कोट्यवधी रुपये

Billions of rupees for four tanks in e-ward
Billions of rupees for four tanks in e-ward
Updated on

कोल्हापूर : शहरातील ई वॉर्डातील तब्बल 26 प्रभागांचा पाणी प्रश्‍न आजही कायमच आहे. पाणी उच्चदाबाने येण्यासाठी विविध चार ठिकाणी पाण्याच्या टाक्‍या बांधल्या. यावर कोट्यवधी रुपये खर्च झाले; पण या टाक्‍या कधी भरतच नाहीत. टाक्‍या भरण्यासाठी ई वॉर्डाला किमान 30 एमएलडी पाण्याची गरज आहे. मग टाक्‍यांवर कोट्यवधीचा खर्च केलाच कशाला? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. 

शाहूपुरी भाजी मंडई टाकी : 
ही टाकी बांधून पाच वर्षे झाली. ही टाकी बांधण्यासाठी तत्कालीन नगरसेवक प्रकाश नाईकनवरे यांनी पाठपुरावा केला. या परिसराला पाण्याचा प्रश्‍न उद्‌भवू नये, योग्य दाबाने पाणी मिळावे, यासाठी ही योजना आखली. टाकीत कनेक्‍शनही जोडले; पण टाकीत पाणी पडेपर्यंत पाणीच संपते. 

कावळा नाका-मार्केट यार्ड टाकी : 
शहरातील उंचावर टाकी आहे. 2008 पर्यंत ही पाण्याची टाकी भरत होती; पण आता ती भरत नाही. शिवाजी पार्क, साईक्‍स एक्‍स्टेंशन, शाहूपुरी, कावळा नाका ते मार्केट यार्ड लोणार वसाहतपर्यंत अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. मुबलक आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा व्हावा, म्हणून मार्केट यार्ड येथेही टाकी बांधली. टाकी बांधल्यापासून त्या टाकीतून पाणीपुरवठा झालेला नाही. मार्केड यार्ड प्रभागाच्या नगरसेविका सुरेखा शहा यांनी सभागृहात लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. ई वॉर्डातील सर्वच नगरसेवकांनी आवाज उठवूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

ताराबाई पार्क टाकी : 
ताराबाई पार्क येथील पाण्याच्या टाकीची दुरवस्था होती. तिचा स्लॅब कोसळला होता. नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांनी पाठपुरावा केला. जुन्या टाकीला मजबुती दिली. स्लॅबचे काम झाले नाही. दुसरी टाकी बांधण्याचाही योजनेत समावेश आहे; पण जागा एमजेपीची की महापालिकेची, हा वाद सुरू आहे. ही टाकीही भरत नाही. 

कसबा बावडा टाकी 
कसबा बावडा येथेही पाण्याची टाकी बांधून तयार आहे; पण या टाकीतही अद्याप पाणी पडलेले नाही. कसबा बावडा, मार्केट यार्ड, शाहूपुरी, कावळा नाका, ताराबाई पार्कसह या विविध टाक्‍यांवर शहराचा बराचसा भाग अवलंबून आहे. कोट्यवधी रुपये खर्च झाले; पण टाक्‍यांवरचा हा खर्च सध्या तरी वायाच गेल्यासारखी स्थिती आहे. 

ई वॉर्डातील 26 प्रभागांचा हा प्रश्‍न आहे. पाणी येईपर्यंत संपते. पाण्याच्या टाक्‍या भरत नाहीत. वापराएवढे तरी पाणी मिळावे, यासाठी बायपास करून पाणीपुरवठा होत आहे; मात्र हा प्रश्‍न सोडवावा, अशी मागणी आहे. याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. या टाक्‍या भौगोलिकदृष्ट्या शेवटच्या टोकाला असल्याने पाणी येईपर्यंत संपते. 
- आशिष ढवळे, नगरसेवक 

तक्रारी केल्या, मी सभागृहात असताना आणि सून पूजा यांनीही वारंवार याकडे लक्ष वेधले; पण प्रशासन केवळ आश्‍वासनच देते. 
सध्या बायपास करून परिसराला पुरेसे पाणी देतो; पण पाण्याच्या टाकीतून ज्यावेळी पाणीपुरवठा होईल त्यावेळी पुरेसे, मुबलक पाणी मिळेल. 
- प्रकाश नाईकनवरे, माजी नगरसेवक 

40 एमएलडी पाणी मिळते 
ई वॉर्डाला पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र शिंगणापूर योजना आणली. या योजनेवरही मोठा खर्च झाला. शिंगणापूर ते कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्र अशीही योजना केली. या योजनेतून सध्या ई वॉर्डासाठी 40 एमएलडी पाणी मिळते. पुईखडी येथील स्रोतातून 4 एमएलडी पाणी मिळते. अद्यापही 30 एमएलडी पाण्याची गरज आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com