
आघाडीने दाखवून दिले ‘हम सब एक है’
कोल्हापूर : भाजपविरोधात ‘हम सब एक है’ याची जाणीव उत्तर मतदारसंघात महाविकास आघाडीने करून दिली. काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे सर्वच नेते व्यासपीठावर एकमूठ बांधून उभे असल्याचे चित्र दिखावा नव्हता, हे आजच्या मतमोजणीतून कळून चुकले. राज्य सरकारमध्ये ज्या पद्धतीने आघाडी एकदिलाने काम करीत आहे, ती गल्लीबोळापर्यंत कायम असल्याचाही संदेश निवडणुकीतून राज्याला गेला. आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि घटकपक्षांच्या एकजुटीने विजय खेचून आणून नांदेड, पंढरपुरातील पोटनिवडणुकीत एक-एक झालेला सामना कोल्हापूर उत्तरने जिंकून सरशी केली.
पोटनिवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. त्यामुळे महाविकास आघाडी एकसंध राहणार नाही. त्याचा फायदा विरोधी उमेदवाराला होईल, अशी स्थिती निवडणूक जाहीर झाल्यानंतरही होती. मात्र खुद्द मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर क्षीरसागर यांनी माघार घेतली. ‘मातोश्रीवरील आदेश आणि थांबला राजेश’ अशी त्यांची सोशल मीडियावर जाहिरातही झाली. त्यांना थांबविणे एवढंच नव्हे तर त्यांच्याकडून मनापासून प्रचार होणेही अपेक्षित होते. शिवसेनेचे मतदार ‘हाता’ला मतदान करणार नाहीत अशी संभ्रमावस्था निर्माण केली होती. मात्र ती फोल ठरविण्याचे काम आघाडीने शेवटपर्यंत कायम ठेवले, त्याचाही मोठा वाटा आज जयश्री जाधव यांच्या विजयात आहे.
पोटनिवडणूक असली तरीही राज्यपातळीवरील राजकारण ढवळले होते. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण, खासदार विनायक राऊत आणि अमोल कोल्हे, मंत्री उदय सामंत यांनी कोल्हापुरातील जनतेला आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना मतदान करण्याचे आवाहन केले, त्याचाही परिणाम मतदारांवर झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या टप्प्यात व्हर्चुअल बैठक घेवून शिवसैनिकांना केलेले आवाहन ही महत्त्वाचे ठरले. हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, पी.एन.पाटील, राजू आवळे यांनीही कार्यकर्त्यांना बांधून ठेवले.
पराभूत झाल्यापासून अलिप्त असलेल्या मालोजीराजे छत्रपती यांनीही पुनर्वसन होईल, अशा ताकदीने अस्तित्व दाखवून दिले. त्यांचाही प्रभाव पेठांतील मतदानांतून दिसून आला. कार्यकर्त्यांना एकवटून ठेवणे, स्थिती संयमाने हाताळणे, विरोधकांच्या चुकांचा बाऊ करणे, आक्रमक विधानांपासून दूर राहून महागाईच्या मुद्द्याला आघाडीने पुढे केले. मात्र विरोधकांच्या आक्रमकतेला संयमाने उत्तर देत कार्यकर्त्यांची मोट बांधल्यामुळेच आज विजयाची गुढी उभा राहू शकली.
भावनिक प्रचारावर भर
एकहाती नियोजन करणाऱ्या आणि बहिणीला कोल्हापूरची जनता अर्ध्यावर सोडणार नाही. कोल्हापुरात अजून माणुसकी आहे, हे जनता महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दाखवून देईल, असा विश्वास मतदानापूर्वीच पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दाखविला होता, तो मतदारांनी सार्थ ठरविला. गल्लोगल्लीत काय चालले आहे, यावर बारकाईने लक्ष ठेवून संयमाने स्थिती हाताळल्याचा परिणाम आज मतपेटीतून दिसून आला.
Web Title: Bjps Correct Program By Playing Satej Vk11
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..