चाकरमान्यांच्या नोंदीचे आव्हान

The Challenge Of Record Of Servants In Rural Area Kolhapur Marathi News
The Challenge Of Record Of Servants In Rural Area Kolhapur Marathi News

राशिवडे बुद्रुक : लॉकडाउनच्या काळात जिल्ह्याबाहेरून आलेल्या नागरिकांची आता विलगीकरणाची मुदत संपत आली असल्याने राधानगरी तालुक्‍यात दिलासादायक चित्र आहे. मात्र, आता गावागावातील नागरिकांपुढे नवे संकट आहे ते म्हणजे पुणे, मुंबईतून विनापरवाना येणाऱ्या चाकरमान्यांचे. कुणालाही न कळता येणाऱ्या या चाकरमान्यांना शोधून नोंद ठेवणे आव्हानात्मक ठरत आहे. दरम्यान, याबाबत अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. 

गेले पंधरा ते वीस दिवस शासनाचे सर्व नियम पाळून राधानगरी तालुक्‍यातील सर्व गावकऱ्यांनी सुरक्षेचे बंध पाळले. अगदी सुरवातीच्या दोन दिवसांत गावामध्ये जे पुण्या-मुंबईहून लोक आले त्यांचे विलगीकरण करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यापर्यंत सर्व नियोजन झाले. 
तालुक्‍यात सुमारे सहा हजार लोक अशा परिस्थितीत विलग केले होते. त्यांचा कार्यकाल आता संपला आहे. काहींचा संपत आला आहे. या काळात एकही कोरोनाग्रस्त निदर्शनास न आल्याने तालुक्‍याने सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

आता मात्र मुंबई-पुण्यामध्ये मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळल्याने तेथून चाकरमानी गावी येत आहेत. शहरांमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी, कोरोनाचे वाढते संकट यामुळे साहजिकच त्यांचा ओढा गावाकडे, घराकडे असल्याने ते हा मार्ग पत्करत आहेत. या अचानक येणाऱ्या नागरिकांचे काय करायचे, हा प्रश्‍न आता पुढे येऊ लागला आहे. एक तर त्यांच्या घरचे लवकर दक्षता कमिटीला सांगत नाहीत आणि दक्षता कमिटी व आरोग्य विभागाने क्वारंटाइन केल्यानंतर तितकी दक्षता विलग केलेले लोक घेत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शासकीय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी व गावकरीही धास्तावले आहेत. 

नियंत्रण ठेवण्याच्या सूचना
असे प्रकार अनेक गावांमध्ये घडत आहेत. कोणत्याही परवानगीशिवाय पुण्या-मुंबईहून किंवा बाहेरच्या जिल्ह्यातून लोक आल्याचे आमच्या निदर्शनास आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. तरीही आम्ही दक्षता कमिटीला दक्ष राहण्यास कळवले असून अशा लोकांवर पूर्ण नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
- मीना निंबाळकर, तहसीलदार, राधानगरी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com