
कोल्हापूर : सर्किट बेंचबाबत आणखी एक पाऊल
कोल्हापूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची आज भेट झाली. यामध्ये कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू करण्याबाबत चर्चा झाली. त्यामुळे सहा जिल्ह्यांतील वकिलांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे, या मागणीसाठी ३८ वर्षे लढा सुरू आहे. कोल्हापुरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग या सहा जिल्ह्यातील वकील, पक्षकार, सामाजिक संघटनांसह सर्वसामान्य असे सर्व घटक हा लढा देत आहेत. दरम्यान पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सर्किट बेंचचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी सहा जिल्ह्यातील सर्व पक्षीय मंत्री आमदार खासदारांची एकत्रित मुंबईत बैठक घेतली.
बैठकीत विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांना हा प्रश्न सोडविण्यासाठी मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत सभापती निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून किंवा प्रत्यक्षात संवाद साधून बैठकीची माहिती दिली जाईल. त्यांनी मुख्य न्यायमूर्तींशी संवाद साधावा, अशीही विनंती केली जाईल असे सांगितले होते. यानंतर मुख्यमंत्री यांनी मुख्य न्यायमूर्तीं यांच्याशी पत्रव्यवहार केला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना पाठविलेल्या पत्राचा आशय घेत, त्यांना सर्किट बेंचची आवश्यकता समजवून सांगितली. तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी २०१२, २०१३, २०१५, २०१८ आणि २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या तत्कालीन मुख्य न्यायमूर्तींकडे पत्रव्यवहार केला आहे. १९८४ मध्ये औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन झाल्यानंतर राज्यातील दक्षिणेकडील प्रदेशात समाविष्ट असलेल्या सहा जिल्ह्यासाठी कोल्हापूर येथे सर्किट बेंच व्हावे अशी सातत्याने मागणी केली जात आहे.
राज्यातील याचिकाकर्त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उच्च न्यायालयाची खंडपीठे नव्याने स्थापन करण्याबाबत भारतीय कायदा आयोगाने अध्याय २३० मधील अहवालात परिच्छेद क्र.१.८, १.९ आणि १.१० नुसार शिफारस केली आहे. लोकप्रतिनिधींकडूनही हा मुद्दा सातत्याने विधीमंडळात मांडला जातो. त्यामुळे कोल्हापुरातील सर्किट बेंच स्थापन करण्याच्या मागणीचा अनुकूलपणे पुनर्विचार करणे आवश्यक आहे. नियमित खंडपीठाची स्थापना होईपर्यंत लवकरात लवकर मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे स्थापन व्हावे, अशीही मागणी केली. सकारात्मक चर्चेमुळे सर्किट बेंचबाबत आशा पल्लवित झाल्या असून सहा जिल्ह्यांतील वकील वर्गासह सर्वसामान्यांत उत्साहाचे वातावरण आहे.
Web Title: Cm Uddhav Thackrey Meet Chief Justice Dipankar Datta Kolhapur Circuit Bench
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..