esakal | Coconut Day Special: गार्डन्स क्लबच्या सदस्यांचे Skill;श्रीफळापासून बनविल्या 50 वस्तू
sakal

बोलून बातमी शोधा

coconat

गार्डन्स क्लबच्या सदस्यांचे Skill; श्रीफळापासून बनविल्या 50 वस्तू

sakal_logo
By
नंदिनी नरेवाडी - पाटोळे

कोल्हापूर : घरात सण, अमावस्या आली की किराणा मालाच्या दुकानातून नारळ आणायचा, तो फोडायचा आणि घरातल्या लहानग्यांनी त्यातील पाणी प्यायचे. नारळातील खोबरं आमटी, भाजीला वापरायचे. कधीतरी त्याचे कानुले करायचे. कधीतरी बर्फी बनवायची, या पलीकडे शहरी भागात नारळाचा वापर अभावानेच होतो. मात्र, याच नारळाच्या झाडाच्या मुळापासून पानाच्या शेंड्यापर्यंत प्रत्येक कण नित्य जगण्यातही उपयुक्त ठरणारा आहे, हे जाणलेल्या गार्डन्स क्लबच्या सदस्यांनी नारळी झाडांच्या प्रत्येक घटकाचा कौशल्याने वापर करत त्याला उपयुक्ततेची जोड दिली आहे. नित्य वापरात येऊ शकतील, अशा ५० हून अधिक वस्तूंपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत नारळी झाड कसे कल्पतरू आहे, याची झलक दाखवली आहे.

गार्डन्स क्लबतर्फे ‘कल्पतरू’ महोत्सवांतर्गत ‘कोकनट’ शॉपीमध्ये नारळाच्या झाडांचे भाग ते नारळ, नारळातील खोबरे अशा प्रत्येक घटकाचा कलाकौशल्याने वापर करून वस्तू बनविणाऱ्या व्यक्ती कोणी फारशा वेगळ्या नाहीत. घरी सकाळी स्वयंपाक आवरला की मिळालेल्या फावल्या वेळेत वापरलेल्या नारळाच्या भागापासून विविध वस्तू करण्यात या महिलांनी मन गुंतवले. थोडेसे कष्ट आणि कौशल्य वापरून कोणी नारळाच्या शेंडीपासून ब्रश, करंवट्यापासून मुखवटे, केसरापासून पायपुसणे, गोटा खोबरं वापरून बर्फीपासून डोशापर्यंतचे पदार्थ बनविले. कधी न खाल्लेला पदार्थ, रोजच्या वापरात उपयुक्त वस्तू या महिलांनी बनविल्या आहेत. या वस्तू या प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. शाहूपुरी तिसऱ्या गल्लीतील राधाकृष्ण सांस्कृतिक सभागृहात गुरुवारी (ता.२) सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत हे प्रदर्शन खुले असेल.

घरात आणलेल्या नारळाचे अवशेष जमविले आणि त्यापासून विविध गरजेच्या, सजावटीच्या वस्तू बनविल्या. या वस्तू इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्या की या घरात साठविणे शक्य नाही. यातून या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध केल्या. यातून नवा लघुउद्योग जन्माला घातला आणि त्यातून तयार झाल्या नारळापासून इतक्या व्हरायटी. यामध्ये वीस जणांनी नारळापासून पन्नासहून अधिक वस्तू बनविल्या आहेत.

हेही वाचा: सांगली पोलिस दलातील खेळाडू रोहितची प्रो कबड्डीत एंट्री

कोणी काय बनविले?

गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा कल्पना सावंत- नारळाच्या दुधाची पावडर, दिवे

शिल्पा नरके- काथ्यापासून हस्तकला वस्तू

संगीता कोकितकर- कोकेडमा

स्मिता देशमुख-काथ्याची काठी

शैला निकम- बर्फी

प्राजक्ता चरणे- खोबरेल तेल

वर्षा वायचळ-करवंट्याचे मुखवटे, पक्ष्यांचे घरटे

रेणुका वाधवानी- नारळ चॉकलेट

रश्मी भुमकर- ज्युट बॅग्ज

रोहिणी पाटील- खराटा, खोबरेल तेलाचा साबण

रवींद्र साळुंखे- नारळ खत

श्रीफळ हे आपल्या संस्कृतीत पवित्र मानले जाते. शिवाय या झाडाच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग आहे. म्हणूनच या झाडाला कल्पतरू म्हणतात. नारळाचे हेच महत्त्व सांगण्यासाठी गार्डन्स क्लबतर्फे कल्पतरू महोत्सव आयोजित केला होता. यामध्ये आपल्या परिसरातीलच महिलांनी नारळापासून विविध व कलात्मक वस्तू बनविल्याचे लक्षात आले. अशाच आगळ्या वेगळ्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले आहे.

- पल्लवी कुलकर्णी, सचिव, गार्डन्स क्लब

loading image
go to top