
नियम फक्त जनतेला, राजकारण्यांना नाही; गोकुळ निवडणुकीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
कोल्हापूर : कोरोनाची संचारबंदी जनतेसाठी. पाच पेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र यायचे नाही. सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग ठेवायचे लोकांनी. मात्र यातील एकही नियम राजकीय नेत्यांना नाही. त्यांनी या आपत्तीच्या काळात कसेही वागले तरी चालते. याची प्रचिती आज (2) झालेल्या गोकुळ मतदानावेळी दिसून आली. पोलिसांनीही सोयिस्करपणे याकडे दुर्लक्ष केले. मतदानकेंद्रावर यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जाच उडाला होता.
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने संचारबंदी लागू केली. सकाळी सात ते अकरा या वेळेतच नागरिकांना रस्त्यावरून फिरता येते. मात्र अन्यवेळी ते विनाकारण फिरू शकत नाहीत. गोकूळ निवडणूकीचे मतदान असल्याने मतदारांना मतदान करण्यासाठी ये-जा करण्याची मुभा होती. मात्र यावेळी कार्यकर्ते, नेते आणि मतदारांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले नाही. दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी मतदारांचे शक्तीप्रदर्शन करत त्यांना मतदान केंद्रावर आणले.
यावेळी मतदारांचा जमावच रस्त्यावरून जात होता. त्यांच्यामध्ये एक फुटाचेही अंतर नव्हते. मतदान केंद्राबाहेर उमेदवार, कार्यकर्ते, नेते हे गर्दी करूनच उभे होते. त्यांनी देखीलही डिस्टन्सिंगचे निमय पाळले नव्हते. कार्यकर्त्यांचे जथ्थे ठिकठिकाणी उभे होते. यावरून नियम हे केवळ सामान्य माणसांना असतात. राजकारणी, राजकीय कार्यकर्ते यांना कोणतेही नियम लागू नसतात हेच दिसून आले.
पोलिस अधीक्षक आले आणि गेले
मतदानकेंद्राच्या बाहेर मोठा पोलिस बंदोबस्त होता. मात्र सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लघंन होत असताना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. शक्ती प्रदर्शन करत रस्त्यावरून निघालेल्या मतदारांच्या जथ्याकडे दुर्लक्ष केले. केवळ ध्वनीक्षेपकावरून सूचना देण्याचे काम केले. त्यानंतर पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे विवेकानंद महाविद्यालया बाहेर आले. त्यांनी कार्यर्त्यांची गर्दी पाहिली सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन होत नसल्याचेही त्यांना दिसले. मात्र कोणतीही कारवाई, अथा सूचना न करताच ते निघून गेले. एरवी नागरिक पोलिसांची अरेरावी अनुभवतात, आज मात्र पोलिसांनी या सर्व प्रकाराकडे दूर्लक्ष केल्याचे दिसते.