हॅलो साहेब... शेजाऱ्यानं कचरा रस्त्यावर फेकलाय; मुलही 'धिंगाणा' घालताहेत!

हॅलो साहेब... शेजाऱ्यानं कचरा रस्त्यावर फेकलाय; मुलही 'धिंगाणा' घालताहेत!

कोल्हापूर: हॅलो साहेब, शेजाऱ्याने कचरा थेट रस्त्यावर टाकलाय. मुले रस्त्यावर धिंगाणा घालत आहेत. तुम्ही तातडीने येथे या, संबंधितांवर कारवाई करा... अशा तक्रारींचे फोन पोलिस (Police Station)ठाण्यात येण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संकटकाळातील (Corona crisis)बंदोबस्ताबरोबरच अशा लहानसहान तक्रारींची दखल घेताना पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक होत आहे.

covid 19 kolhapur atmosphere kolhapur marathi news

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून संचारबंदी लागू केली आहे. शासनाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यासाठी जिल्हा पोलिस यंत्रणा रस्त्यावर बंदोबस्त बजावत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करत आहे. पोलिसांना बंदोबस्ताबरोबरच गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासह तपासाचे कामही करावे लागत आहे.

दुसरीकडे मात्र पोलिस ठाण्यात फोनवरून लहान सहान तक्रारी येण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. पोलिस ठाण्यात येणारा फोन उचलून हॅलो म्हणण्याअगोदरच समोरून ‘‘साहेब आम्ही संचारबंदीचे पालन करतो. आम्ही घरातून बाहेर पडत नाही; पण गल्लीतील मुले बिनधास्त फुटबॉल, क्रिकेट खेळत असून त्यांचा धिंगाणा सुरू आहे.

संसर्ग रोखण्यासाठी आसपास स्वच्छता हवी; पण शेजारी मात्र घरातील कचरा थेट रस्त्यावर फेकतो. अस्वच्छतेमुळे संसर्ग वाढला आहे. आम्ही टेरेसवरच फिरतो; मात्र भागातील नागरिक कोणाची पर्वा न करता, मास्क न लावता सकाळ-संध्याकाळ फिरत असतात. गल्लीतील बाकड्यावर गप्पांचा फड रंगलाय... तुम्ही तातडीने आमच्या भागात या. संबंधितांवर कारवाई करा; पण आमचे नाव विचारू नका.’’ अशा फोनवरून येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे.

पोलिस ठाण्यात फोनवरून दररोज येणाऱ्या अशा प्रत्येक तक्रारीची दखल पोलिसांकडून घेतली जाते. दैनंदिन काम, बंदोबस्त त्यात अशा तक्रारींची दखल घेऊन संबंधितांना शोधून कारवाई करताना मात्र पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे. संचारबंदीचे पालन हे पोलिसांसाठी नव्हे, तर तुम्हा, आम्हाला संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी आहे. याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार केला तरच अशा पद्धतीच्या तक्रारींचे प्रमाण कमी होऊन कोरोना संकटाचा प्रादुर्भाव रोखता येईल.

दृष्टिक्षेपात

जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांची संख्या - ३१

पोलिस चौकी व दूरक्षेत्र चौकी - ३१

पोलिस कर्मचारी - २७६२

पोलिस अधिकारी - १५९

covid 19 kolhapur atmosphere kolhapur marathi news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com