बकरीपालन भासवलं, प्रत्यक्षात ड्रग्जचा बाजार; कारखाना मालकाचा शोध सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drug

आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीमध्येही सहभाग असण्याची शक्यता आहे.

बकरीपालन भासवलं, प्रत्यक्षात ड्रग्जचा बाजार; कारखाना मालकाचा शोध सुरु

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंदगड : ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथे मुंबई क्राईम ब्रॅंचच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात एमडी हा अमली पदार्थ बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला. कोल्हापूर जिल्ह्यातील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. कारखान्यातील कामगार निखिल रामचंद्र लोहार (वय २९, रा. ढोलगरवाडी, ता. चंदगड) याला पोलिसांनी अटक केली आहे. तत्पूर्वी मुंबई येथे एका महिलेला अटक केली असून, तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आतापर्यंत दोन संशयितांना अटक झाली असून पोलिसांनी दोन कोटी ३५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हा कारखानाही पोलिसांनी सील केला आहे. कारखान्याचा मालक संशयित राजकुमार अर्जुनराव राजहंस याचा पोलिस शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, क्राईम ब्रॅंचच्या बांद्रा युनिटला मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील खैराणी रोड, साकीनाका येथे एका महिलेची झडती घेण्यात आली. तिच्याकडे सुमारे पाच लाख रुपये किमतीचे ५० ग्रॅम एमडी आढळले. हा पदार्थ बनवण्याचा कारखाना ढोलगरवाडी येथे असल्याचे तिच्याकडून समजले. त्यानुसार पोलिस निरीक्षक सुतार, दहिफळे, सहायक पोलिस निरीक्षक वाहीद पठाण, उपनिरीक्षक पवळे यांच्यासह सहकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. त्यावेळी राजहंस याच्या फार्म हाउसची देखरेख करणारा संशयित निखिल लोहार तेथे आढळला. तोही एमडी बनवण्याकामी मदत करीत असल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा: नेपाळने सीमावाद उकरुन काढला, भारतातल्या तीन गावांवर सांगितला हक्क

घटनास्थळी एमडी बनवण्याकरिता वापरात येणारी रसायने, काचेची उपकरणे तसेच १२२ ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ व ३७ किलो ७०० ग्रॅम वजनाचा कच्चा माल आढळला. संशयित राजहंस हा कारखान्यात तयार होणारा अमली पदार्थ मुंबई शहर व उपनगर येथे येऊन ड्रग्ज पेडलरना विक्री करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्याचा आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीमध्येही सहभाग असण्याची शक्यता आहे.

संशय येऊ नये म्हणून...

संशयित राजहंसने या कारखान्यात पोल्ट्री फार्म तसेच बकरीपालन करीत असल्याचे ग्रामस्थांना भासवले होते. प्रत्यक्षात तेथे अमली पदार्थ बनवला जात होता. त्याचे शहरी राहणीमान आणि शेतात काम करीत असल्याची बतावणी याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम होताच. या ठिकाणी उत्पादन केलेला पदार्थ मुंबईतच अधिक पाठवला जात होता. तो तयार करण्याची पद्धत अत्यंत क्लिष्ट आहे. ती कशी अवगत झाली, हे शोधणे महत्त्वाचे आहे. तसेच यातून मिळालेल्या पैशाचा विनियोग नेमका कशासाठी झाला, याचाही तपास आवश्यक आहे.

हेही वाचा: काबूल पुन्हा बॉम्बस्फोटाने हादरलं, इस्लामिक स्टेटने घेतली जबाबदारी

loading image
go to top