esakal | भयानक! महिला पोलिसाने सासूला पेटविले; कौटुंबिक वादातून कृत्य
sakal

बोलून बातमी शोधा

भयानक! महिला पोलिसाने सासूला पेटविले; कौटुंबिक वादातून कृत्य

भयानक! महिला पोलिसाने सासूला पेटविले; कौटुंबिक वादातून कृत्य

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : कसबा बावडा (kasaba bawda) येथील महिला पोलिसाने (police) कौटुंबिक वादातून सासूला पेटविले. यात सासू गंभीर जखमी झाल्या असून, आशालता श्रीपती वराळे (वय ८०, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, कसबा बावडा) असे त्यांचे नाव आहे; तर संगीता राजेंद्र वराळे (वय ५१) असे संशयित महिला पोलिसाचे नाव असून, तिला अटक करण्यात आली आहे. रविवार (४) मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता वराळे पोलिस दलात हवालदार असून, सध्या तिची पोलिस मुख्यालयात नेमणूक आहे. कसबा बावड्यात ती सासरी एकत्र कुटुंबात राहते. तिचे पती शेती करतात. तिला मुलगा आहे. सुरवातीपासून सर्व जण एकत्र राहत होते. मात्र, कौटुंबिक वाद सुरू झाल्याने ती लाईन बझार येथील पोलिस वसाहतीतील घरात राहण्यासाठी गेली. काही कारणांनी पुन्हा मूळ घरी राहण्यासाठी आली होती.

हेही वाचा: लाच घेताना तलाठी जाळ्यात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

काल मध्यरात्री एकच्या सुमारास संगीता हिने कौटुंबिक वादातून सासू (mother-in-law) आशालता यांच्या तोंडावर पेट्रोल टाकले. त्यानंतर कागद पेटवून तो तोंडावर टाकला. पेटलेल्या अवस्थेत सासू आशालता यांनी आरडाओरड केला. त्यामुळे बाजूच्या घरातच राहणारे वराळे यांचे नातेवाईक बाहेर आले. त्यांनी घरात जाऊन आग विझवली. आशालता या जखमी झाल्याने त्यांना सेवा रुग्णालयात नेण्यात आले. तेथून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आशालता यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली. संगीता वराळे हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिला अटक करण्यात आली आहे.

संतापाचे वातावरण

मध्यरात्री घडलेल्या घटनेची माहिती सकाळी परिसरात पसरली. महिला पोलिसाने हे कृत्य केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी मध्यरात्री रुग्णालयात जाऊन सविस्तर माहिती घेतली.

loading image