esakal | लॉकडाऊनच्या धास्तीने गडहिंग्लजला उसळली गर्दी

बोलून बातमी शोधा

Crowds Flocked To Gadhinglaj In Fear Of The Lockdown Kolhapur Marathi News

दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन कडक झाला. दरम्यान, संपूर्ण लॉकडाऊनची तयारी सुरु झाली आहे. त्या धास्तीमुळे लोक खरेदीसाठी रस्त्यावर उतरले. परिणामी गडहिंग्लज बाजारपेठेत आज सकाळपासूनच गर्दी उसळली.

लॉकडाऊनच्या धास्तीने गडहिंग्लजला उसळली गर्दी

sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज : दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन कडक झाला. दरम्यान, संपूर्ण लॉकडाऊनची तयारी सुरु झाली आहे. त्या धास्तीमुळे लोक खरेदीसाठी रस्त्यावर उतरले. परिणामी गडहिंग्लज बाजारपेठेत आज सकाळपासूनच गर्दी उसळली. "ब्रेक दि चेन' अंतर्गत प्रशासनातर्फे अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर दुकाने बंदचे आवाहन केले तरी फारसा प्रतिसाद मिळाला नाही. गर्दीमुळे कोरोना नियमांचा मात्र फज्जा उडाल्याचे चित्र होते. 

दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊननंतर आज पहिल्याच दिवशी बाजारपेठेत गर्दी उसळली. शासनाकडून संपूर्ण लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्‍यता आहे. या धास्तीची भरही आजच्या गर्दीमध्ये पडल्याचे पहायला मिळाले. लॉकडाऊन कसे असणार, हे अजून निश्‍चित नसतानाही नागरिकांनी किराणा मालासह इतर खरेदी करण्यासाठी आज बाजारपेठेत रांगा लावल्या. त्यातच भाजीसह अन्य विक्रेतेही रस्त्यावर ठाण मांडल्याने आज गडहिंग्लजला आठवडा बाजाराचे स्वरुप आले होते.

कुठेही सोशल डिस्टन्सींग नव्हता. अनेक जण मास्कविनाच बाजारात फिरत होते. शहरातील सर्वच दुकाने उघडल्याने मिनी लॉकडाऊनला अगदीच कमी प्रतिसाद आज मिळाला. पंधरा दिवसांचा लॉकडाऊन गृहीत धरुन नागरिकांची संसार साहित्याचा साठा करण्याची धडपड पहायला मिळाली. 
आजची गर्दी पाहून पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड व पालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्यात चर्चा केली. त्यानंतर अत्यावश्‍यक सेवा वगळून सुरू असलेल्या इतर दुकानदारांना बंदचे आवाहन करण्यात येत होते.

गायकवाड यांच्यासह पोलिस व पालिका कर्मचाऱ्यांचे पथक दोन वाहनांद्वारे शहरातून फेरफटका मारला. ध्वनीक्षेपकावरून आवाहन करत असतानाच दुकाने बंद झाल्या नाहीत तर कारवाईचा इशाराही देण्यात येत होता. परंतु, दुकाने दिवसभर सुरुच राहिली. विनामास्क फिरणाऱ्यांवर मात्र पोलिस व पालिकेच्या संयुक्त पथकाने दंडात्मक कारवाई सुरू केली होती. 

पाडव्याच्या खरेदीची तयारी 
गुढी पाडव्याच्या खरेदीची तयारीही काही नागरिकांनी आज सुरू केली होती. इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंसह दुचाकी, चारचाकी वाहन, सोने बुकींगसाठी आजच काही नागरिकांनी संबंधित दुकानांचा दरवाजा ठोठावला. पाडव्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या गर्दीने बाजारपेठेत उत्साह होता. उद्या पाडव्यादिवशीही खरेदीसाठी झुंबड उडण्याची शक्‍यता आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur