कोवाड : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्यावश्यक सेवा सुविधा उपलब्ध होऊन रुग्णांना चांगल्या दर्जाच्या सेवा मिळाव्यात व किणी कर्यात भागातील लोकांच्या सेवेसाठी कोवाड-मुंबई ही रातराणी बस सुरू करावी, अशी मागणी मुंबई येथील निट्टूर ग्रामस्थ मंडळाच्या सदस्यांनी आमदार राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
निट्टूर मुंबई ग्रामस्थ मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथे आमदार राजेश पाटील यांची भेट घेवून मागण्यांचे निवेदन दिले. आमदार पाटील यांनी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
कोवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे तालुक्यातील पूर्व भागातील महत्त्वाचे आरोग्य केंद्र आहे. जवळपास 25 खेड्यातील रुग्णांना या आरोग्य केंद्राचा आधार आहे. सध्या आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे कामही पूर्ण झाले आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रात अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार पाटील यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी मुंबई ग्रामस्थांनी केली. तसेच तालुक्यातून मोठ्या संख्येने मुंबईला ये-जा करणारे चाकरमनी आहेत. त्यासाठी रातराणी ही बस सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशीही मागणी केली.
आमदार पाटील यांनी मागणीचा गांभिर्याने विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष नरसू पाटील यांनी सांगितले. या वेळी लक्ष्मण पाटील, राजाराम खवनेवाडकर, विठ्ठल पाटील, नरसिंह पाटील, विनायक पाटील उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.