
कोल्हापूर : कोल्हापुरात एक दंतकथा वर्षानुवर्षे ऐकवली जात आहे. कथेच्या स्वरूपात काळानुसार बदल झाले आहेत. या कथेचे सार असे की, मध्यरात्री एक सायकलस्वार किंवा दुचाकीस्वार बावड्याच्या दिशेने जात होता. साहेबांच्या तळ्याजवळ (आताचे वॉटर पार्क) एका महिलेने त्याला हात केला. तो थांबला. ती महिला म्हणाली, मी दवाखान्यात नोकरीला आहे. आज वेळ झाला, मला बावड्यापर्यंत सोडा. त्याने तिला पाठीमागे बसवले. मोटारसायकल रिसाला पोलिस लाईनपर्यंत आली. तो थांबला. मागे बघतो, तर मोटारसायकलवर ती महिला नव्हती. त्याने इकडे तिकडे पाहिले. लांब अंतरावर ती महिला अंतराळी दिसत होती. ते पाहून तो मोटारसायकलस्वार बेशुद्ध होऊन पडला आणि सकाळी त्याच्या तोंडावर पाणी मारूनच त्याला लोकांनी उठवले.
हे पण वाचा - दोन गल्लीच्या गावाला दहा लाखांचे बक्षीस
सपशेल खोटी अशी ही भुताटकीची कथा. ज्याला प्रत्यक्ष अनुभव आला, असे सांगणारा यात कोणीही नाही. तो मोटारसायकलस्वार कोण, हे आजवर कधी कळले नाही; पण याला अनुभव आला, त्याला अनुभव आला, असे सांगून वर्षानुवर्षे ही भुताटकीची दंतकथा ऐकवली जाते.
कोणाला किती पटते, हा वेगळा भाग आहे; पण भुताटकीबद्दल अजूनही दंतकथा पसरवणारी मंडळी समाजात ताजीतवानी आहेत आणि याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील एका मोठ्या व्यापारी संकुलात भूत, अशी आवई काही दिवस शहरात उठली आहे. पूर्वी भुताची कथा कर्णोपकर्णी पसरवली जायची; पण आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्याने व्हॉट्सऍप, फेसबुकच्या माध्यमातून ही आवई घराघरात जाऊन पोचली आहे. अर्थात, शंभर टक्के बनावट अशी ही कथा आहे. एखादी चांगली माहिती लोकांपर्यंत पोचायला वेळ लागतो; मात्र सनसनाटी निर्माण करणाऱ्या माहितीचा किती झटपट विस्फोट होतो, याची या निमित्ताने प्रचीती आली आहे. कोल्हापूर कितीही आधुनिक झाले तरी काहींच्या मानेवर भूत अजून कसे घट्ट बसून आहे, हेच या निमित्ताने काही लोकांनी दाखवून दिले आहे.
हे पण वाचा - थांबलेली ट्रॉली ठरली त्यांच्यासाठी काळ
अर्थात यातला हा प्रसंग ताजा आहे; पण कोल्हापूर परिसरातील काल्पनिक भुतांचा वावर खूप जुना आहे किंवा या भुतांचा प्रभाव इतका की, 1800 सालातील बॉम्बे गॅझेटियरमध्ये या भुतांचे ठळक उल्लेख आहेत. अर्थात त्यात कोणतेही तथ्य नाही. पण भूत ही संकल्पना कोल्हापुरात किती वर्षांपासून झिरपत आली आहे, हे जाणून घेण्यासाठी पुरेशी आहे. आज समाज सुधारला आहे. भूत नाही, हे छातीठोकपणे सांगणारे अनेक जण आहेत. कोल्हापुरातला दीड-दोनशे वर्षांपूर्वीचा काळ पाहिला तर रात्री गल्लीच्या तोंडावरच्या कट्ट्यावर, दुकानाच्या फळीवर बसून रंगणाऱ्या गप्पांत भूत हा विषय रात्र चढेल तसा रंगत जात होता. भूत न बघताही भुताचे रंगवून रंगवून वर्णन करणारा प्रत्येक गल्लीत एक जण तरी पटकथाकार हमखास होता. ही काल्पनिक भुते म्हणजे अर्धी कच्ची सुशिक्षित समाजव्यवस्था व लोकांची मानसिकता याचा फायदा घेत तयार केलेले वातावरण होते. आजही ते काही प्रमाणात आहे. ज्याचे डोळे लाल होऊन झटके येऊ लागले, तो असंबद्ध बोलू लागला तर त्याला भूत लागले असे मानले जात होते. एखाद्या पडक्या वाड्यासमोरून किंवा चिंचेच्या झाडांची गर्दी असलेल्या भागात रात्रीच्या वेळी जाणे लोक टाळत होते आणि भूतखेत नाही हे माहीत असूनही उगीच कशाला विषाची परीक्षा घ्या, म्हणून सुशिक्षित लोकही इकडे जाणे टाळत होते. या पार्श्वभूमीवर एका व्यापारी संकुलात भूत आहे, तेथे लावलेली शिडी आपोआप थरथरते, पार्किंगमध्ये अचानक भूत दिसते, अशी 100 टक्के खोटी आवई शहरात उठवली आहे. ती मोबाईलवर वेगाने फिरते आहे. चर्चाबहाद्दरांना त्यामुळे चर्चा रंगवण्याची संधी मिळाली आहे; मात्र हे सारे खोटे आहे, हे प्रत्येकाने एकमेकाला सांगण्याची या परिस्थितीत गरज आहे.
परडी सोडू नये, असा फलकच
कोल्हापुरात वेताळ, कलावंतीण, अस्त्र, ब्रह्मपुरुष, चंडकाई, चुडेल, येलमकरताय, फिरंगी, गीर, जखीण, मुंजा, झोटिंग या नावांनी भुतांना ओळखले जात होते. जेथे तीन रस्ते एकत्र येऊन मिळतात, त्या तिकटीला भुताचा वावर, म्हणून तेथे भात, लिंबू, हळदकुंकू, गुलाल, उकडलेले अंडे भरलेली परडी ठेवली जात होती. विशेष हे की, आजही हे सुरू आहे. रमणमळाजवळ तर "येथे परडी सोडू नये' असा फलकच तिकटीवरच्या एका रहिवाशाने लावला होता व अशी परडी ठेवणाऱ्यांना तो थेट विरोध करत होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.