Diwali Festival 2020: पोलिसांची वाढली डोकेदुखी; दिवाळीचा बाजार रस्त्यावरच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Festival 2020 No decision taken by the municipal administration to make separate arrangements for the Diwali market

निपाणीत पार्किंगला नाही जागा

Diwali Festival 2020: पोलिसांची वाढली डोकेदुखी; दिवाळीचा बाजार रस्त्यावरच!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निपाणी : शहरातील मुख्य बाजारपेठेतील अरुंद रस्ते आणि दिवाळी खरेदीची लगबग पाहता बाजारातील गर्दी अनियंत्रित होत आहे. कोरोनासारख्या महामारीच्या संकटातही दिवाळी बाजार रस्त्यावरच भरत असल्याने गर्दी टाळून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवताना पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे. मात्र दिवाळी २ दिवसांवर आली असतानाही नगरपालिका प्रशासनाकडून दिवाळी बाजाराची स्वतंत्र व्यवस्था करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावरच दुकाने थाटल्याने ग्राहकांच्या वाहनांच्या पार्किंगला जागाच नाही.


दरवर्षी दिवाळी बाजारासाठी निपाणी शहरात वाहनांच्या पार्किंगची वेगळी व्यवस्था केली जात. अशोकनगर, सटवाईरोड, चाटेमार्केट रोडवर होणारी गर्दी टाळण्यासाठी पोलिस आणि नगरपालिकेतर्फे बाजारपेठेत वाहने सोडली जात नव्हती. मात्र यावर्षी अद्याप त्याबाबत कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे शहरातील विविध रस्त्यावर किरकोळ साहित्य विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. रस्त्यावरच हातगाड्या आणि जमिनीवर साहित्य विक्री केली जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे पोलिसांना दररोज या व्यावसायिकांना रस्त्याच्या बाजूला बसण्यासाठी सांगावे लागत आहे. वेळेत नगरपालिका प्रशासनाकडून बाजाराबाबत निर्णय घेतल्यास मुख्य रस्त्यांवर होणारी व्यावसायिकांची गर्दी टाळणे शक्य होणार आहे. रस्त्यावर भरणाऱ्या दिवाळी बाजाराबाबत नगरपालिका प्रशासनाकडून कोणतेही पाऊल न उचलल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

हेही वाचा- कोल्हापुरातील बिंदू चौक-बुरुज आणि‌ तटबंदी


'गर्दी होणाऱ्या रस्त्यावर दिवाळी साहित्याची दुकाने न लावण्याचे आवाहन नगरपालिकेतर्फे केले आहे. तरीही नियमाचे उल्लंघन करून रस्त्यावर दुकाने लावणाऱयांवर कारवाई केली जाईल.'
-महावीर बोरण्णावर,आयुक्त, निपाणी नगरपालिका

'दिवाळी सणाच्या काळात रस्त्यावर बसून साहित्य विक्री करणाऱ्यांसाठी नियम घालून दिले आहेत. शिवाय गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची नियुक्ती केली आहे. बाजारपेठेत चार चाकी वाहने नेण्यास बंदी घातली आहे.'
-अनिलकुमार कुंभार,पोलिस उपनिरीक्षक, निपाणी

संपादन - अर्चना बनगे

loading image
go to top