दिवाळी खरेदीमुळे जयसिंगपूर बाजारपेठेला "बुस्टर' 

Diwali shopping booster for Jaisingpur market
Diwali shopping booster for Jaisingpur market

जयसिंगपूर : कोरोनानंतर आलेल्या दिवाळी सणाच्या खरेदीमुळे बाजारपेठेला दिलासा मिळाला. लाखोंची उलाढाल झाल्याने बाजारपेठेत नवचैतन्य निर्माण झाले. ऑटोमोबाईल, सोने-चांदी, इलेक्‍ट्रॉनिक्‍स बाजारात मोठी उलाढाल झाली. 

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने बाजारपेठ सुरु करत अर्थकारणाला गती देण्याच्यादृष्टिने लॉकडाऊन शिथील केली. टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरु केले जात आहेत. सात महिन्यात उत्साहात दिवाळी सण साजरा केला जाणार असल्याचे अंदाज बांधत व्यापाऱ्यांनी खरेदीकडे कल वळविला होता. जयसिंगपूर शहराच्या बाजारपेठेवर शहरासह परिसरातील जवळपास पंधरा ते वीस गावांचा प्रभाव आहे. याचा चांगला फायदा शहराच्या बाजारपेठेवर जाणवला. 

सोमवारी भाऊबीज आणि पाडवा एकाच दिवशी आल्याने उलाढालीत वाढ झाली. पाडव्याच्या मुहुर्तावर चारचाकी आणि दुचाकी खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. दसऱ्यानंतर बाजाराने हळूहळू उसळी घेतली आहे. शहर परिसरातील औद्योगिक वसाहतीमधील कारखानेही पूर्ण क्षमतेने सुरु झाल्याने कामगारांच्या हाताला काम मिळाले असून कमी अधिक प्रमाणात कामगारांना बोनस दिला गेल्याने दिवाळीच्या काळातही मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी बाजारात गर्दी जाणवली. कोरोनाच्या काळात रसातळाला गेलेली बाजारपेठेतील उलाढाल दसरा आणि दिवाळीनंतर पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 
बांधकाम व्यवसाय अद्याप जैसे थे अवस्थेत आहे. शहरातील अनेक भागात बांधून तयार असणाऱ्या सदनिका ग्राहकांच्या प्रतिक्षेत आहेत. मुद्रांक शुल्क कमी करुन ग्राहकांना स्वप्नातील घर घेण्याची संधी शासनाने दिली असली तरी दसरा आणि दिवाळीनंतरही बांधकाम क्षेत्र अद्याप मरगळलेल्या अवस्थेत आहे. 

ऑटोमोबाईल क्षेत्राने दिवाळीत उभारी घेतली आहे. चार चाकी वाहन खरेदीकडे ग्राहकांचा कल असला तरी मुहुर्तावर गाड्या मिळू शकल्या नसल्याने अनेक ग्राहकांच्या पदरी निराशा आली आहे. दिवाळीच्या काळात अखेरच्या दिवसापर्यंत सोने-चांदी खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी होती. पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी आल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती, मगदूम ज्वेलर्सचे विनोद मगदूम यांनी सांगितले. 

कापड व्यावसायाचीही भरारी 
कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेल्या बाजारपेठेला दिवाळी खरेदीमुळे चांगले दिवस आले आहेत. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील रेडिमेड कापड विक्री उच्चांकी प्रमाणात झाली आहे. यातून लाखोंची उलाढाल झाली आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com