
ही काळजी घ्यावी...
अनोळखी, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका
गोपनीय ओटीपी किंवा बँक तपशील कोणासोबतही शेअर करू नका
पोलिस, आरबीआय बॅंक, प्राप्तिकर खात्यातून बोलत असल्याचे सांगून अटकेची धमकी देणाऱ्यांना घाबरू नका
अनोळखी ॲप्स डाउनलोड करू नका
रिमोट ॲक्सेस ॲप्स मागणाऱ्यांपासून सावध राहा
त्वरित पैसे भरा, नाहीतर खाते गोठवले जाईल, तुमचे सिमकार्ड बंद होणार आहे, अशा फोनना प्रतिसाद देऊ नका
संशयास्पद कॉलबाबत शंका आल्यास बँक, पोलिस ठाण्याशी संपर्क करा
सायबर पोलिसांच्या मदतीसाठी १९३० या राष्ट्रीय हेल्पलाईनवर किंवा cybercrime.gov.in या वेबसाईटवर तक्रार करा
Digital Scam Kolhapur : ‘तुमचे अतिरेकी संघटनेशी संबंध आहेत, तुमच्या बॅंक खात्यातून त्यांना पैसे गेलेले दिसते. तुम्ही निर्दोष आहात, हे दाखविण्यासाठी तुमची बॅंक खाती सर्वोच्च न्यायालयाला दाखवावी लागतील. आम्हाला तुमच्या बॅंक खात्यांची सर्व माहिती देऊन पैसे पाठवा’ असे धमकावत राजारामपुरीतील डॉक्टर पिता-पुत्राला ४१ लाख ९१ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला.
‘डिजिटल अरेस्ट’ नावाखाली तोतया पोलिसाने हा प्रकार केल्याची फिर्याद डॉ. महेश्वर दत्तात्रय शितोळे (वय ३५, रा. राजारामपुरी पहिली गल्ली) यांनी राजरामपुरी पोलिस ठाण्यात दिली. सायबर पोलिसांच्या मदतीने पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.