Dr. Patil on The Expert Committee Of The United Nations Kolhapur Marathi News
Dr. Patil on The Expert Committee Of The United Nations Kolhapur Marathi News

चंदगड तालुक्यातील डॉ. पाटील युनायटेड नेशनच्या तज्ज्ञ समितीवर 

चंदगड : केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात सल्लागार पदावर काम करणाऱ्या गुडेवाडी (ता. चंदगड) येथील डॉ. परशराम पाटील यांची युनायटेड नेशनने बदलत्या वातावरणाचा (क्‍लायमेट चेंज एक्‍सपर्ट ग्रुप) अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ समितीवर निवड केली आहे. जगभरातील 18 लोकांची ही समिती असून त्यामध्ये डॉ. पाटील यांचा समावेश आहे. यापूर्वी अनेक महत्त्वाच्या पदावर निवड झालेल्या पाटील यांच्यासाठी ही निवड महत्त्वपूर्ण आहे. एका खेडेगावातील शेतकऱ्याच्या मुलाच्या यशाचा डोंगर इतरांसाठी स्फूर्तीदायी आहे. 

गुडेवाडी हे बेळगाव- वेंगुर्ला मार्गावरील दुर्गम खेडेगाव. सुमारे दीड हजार लोकवस्तीच्या या गावातून अन्य विद्यार्थ्यांप्रमाणेच डॉ. पाटील यांनी शिक्षण घेतले. आई-वडील शेतकरी. स्वतःच स्वतःचे मार्गदर्शक. दहावीनंतर त्यांनी वाणिज्य शाखेची निवड केली. चंदगडच्या र. भा. माडखोलकर महाविद्यालयातून पदवी संपादन केल्यानंतर एम. कॉमसाठी कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठात प्रवेश घेतला. खऱ्या अर्थाने तिथे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला चालना मिळाली.

उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पीएच.डी. करण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण भागातील कृषी प्रक्रिया उद्योग या विषयातून पुणे विद्यापीठातून पीएच.डी. संपादन करताना त्यांनी घेतलेले कष्ट कामी आले. पदवी प्राप्त होताच अफेडा सारख्या संस्थेत काम करण्याची संधी मिळाली आणि तिथून त्यांनी मागे वळून बघितलेच नाही. कष्ट, प्रामाणिकपणा आणि सातत्य यामुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने त्यांना निमंत्रित केले. स्टार्ट अप इंडियाचे सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत.

गेल्या महिन्यात एशियन बॅंकेने राजस्थानमधील पिक पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती दिली. नुकतीच युनायटेड नेशनकडून त्यांना बदलत्या वातावरणाचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ समितीवर निवड करण्यात आली. याशिवाय अनेक राष्ट्रीय पातळीवरील संस्थावर ते संचालक आणि सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. शेतीविषयक आंतरराष्ट्रीय मॅग्झीनमधून त्यांचे संशोधनपर लेख प्रकाशित होत असतात. या विषयाशी संबंधित पुस्तकांचेही लिखाण केले आहे. त्यांच्या यशाचा हा आलेख कुटुंबीयांसाठी आणि चंदगडकरांसाठीही अभिमानास्पद आहे. 

एखादी जबाबदारी निश्‍चित झाल्यावर त्या दृष्टीने प्रामाणिक काम, विषयाचे संपूर्ण आकलन करून घेण्याचा प्रयत्न आणि स्वतःचे निरीक्षण यामुळे यश येत गेले. जबाबदाऱ्या वाढत गेल्या. कृषी क्षेत्राशी निगडित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करताना मी शेतकरी कुटुंबातील असल्याचा फायदा होतो. मला त्याचा अभिमानही आहे. 
- डॉ. परशराम पाटील 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com