
गडहिंग्लज : संचारबंदीमुळे सारेच व्यवहार ठप्प आहेत. याला मद्यविक्रीचा व्यवसायही अपवाद नाही. दारू दुकान, बार, वाईनशॉप बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश आहेत. परिणामी, मद्यपींची मोठी अडचण झाली आहे. त्यांनी दारूसाठी चोरी केल्याचे प्रकारही समोर आले आहेत. त्याचा धसका राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतल्याचे चित्र आहे. सध्यस्थितीत विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या दारूचा साठा सांभाळणे जिकरीचे बनले आहे. त्यामुळे दारू साठा असलेल्या कार्यालयाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना नाईट शिफ्ट लावली आहे.
दारू दुकानांना टाळेबंदी असल्याने मद्यपींची मोठी अडचण झाली आहे. दारूसाठी त्यांच्याकडून विविध क्लुप्त्या लढविल्या जात आहेत. काही ठिकाणी मद्यपींनी दारूची दुकाने, वाइन शॉप फोडून दारूची चोरी केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू व्यवसाय, बेकायदेशीर दारूची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. यात दारू जप्त केली जाते. जप्त केलेला हा मुद्देमाल बहुतांश ठिकाणी कार्यालयातच एकत्रित ठेवला आहे. सदरची गुन्ह्याची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाशिवाय जप्त केलेली दारू नष्ट करता येत नाही. सहाजिकच जप्त केलेल्या दारुचा मोठा साठा सध्या उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आहे. मद्यपी चोरट्यांकडून हा साठा लक्ष्य होण्याची शक्यता आहे. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी जप्त दारुचा साठा असलेल्या ठिकाणी रात्रीचा पहारा देत आहेत.
तिप्पट दर अन् हातभट्टीची दारू
संचारबंदीमुळे दारूची विक्री करणे कायद्याने बंद आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे स्टॉकची तपासणी केली जात आहे. मात्र, बेकायदेशीर विक्री काही ठिकाणी सुरुच असल्याचे समजते. अवैध विक्रेत्यांकडून संधी साधत तिप्पट दराने विक्री केली जात असल्याचे कळते. तसेच काही मद्यपींकडून हातभट्टीच्या दारुचाही पर्याय स्वीकारला जात आहे. उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांनी आठवडाभरात केलेल्या कारवाईवरुन हे स्पष्ट होत आहे.
kolhapur
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.