
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील बेंडाईचा धनगरवाडा कोल्हापूरपासून केवळ 25 किलोमीटरवर आहे. हा धनगरवाडा स्वातंत्र्यानंतरही 70 वर्षांत रस्त्याविना वनवास भोगत आहे. पायवाटेने जाऊन वस्तीचा विकास कसा होणार? प्रसूतीसाठी महिलांना आणखी किती वर्षे खाटल्यातून दवाखान्यात घेऊन जावे लागणार? असा प्रश्न आहे.
वेतवडे (ता. पन्हाळा) आणि उपवडेपैकी (ता. करवीर) या दोन तालुक्यांच्या हद्दीत हा बेंडाई धनगरवाडा आहे. पन्हाळा तालुक्यातील चार घरे व 22 मतदान, तर करवीर तालुक्यात 16 घरे व 59 मतदान आहे. रस्ता नसल्याने रुग्णांना व गरोदर महिलांना खाटल्यात घालून अंधारात रात्री-अपरात्री डोंगर उतरावा लागतो. यंदा पावसाळ्यात धाकलुबाई बजू देवणे या वृद्धेला खाटावरून कोल्हापुरात उपचारांसाठी पाठवावे लागले. चार वर्षांपूर्वी एका गरोदर महिलेला प्रसूतीसाठी चालत खाटले करून आणले जाताना वेळेत उपचार न झाल्याने तिला जीव गमवावा लागला होता. रात्री रस्त्याअभावी रुग्णांना उपचार मिळत नाहीत. रुग्णाला शिडीवर गादी ठेवून डोंगरातून पाचाकटेवाडी या डोंगर वस्तीवर आणावे लागते. येथे ही वाहतुकीची सोय नसल्याने खासगी वाहने बोलवावे लागतात. यातही दिवस संपतो. रुग्ण कधी-कधी उपचारांसाठी तळमळतो. अनेक मुली रस्त्याअभावी शिक्षण घेत नाहीत. तब्बल 12 नागरिक मतदार यादीत नाव नसल्याने मतदान करू शकत नाहीत.
रस्ता नसल्याने स्वस्त धान्य आणि घरचा बाजार आणण्यासाठी सांगरुळ व पन्हाळा तालुक्यातील काही गावे गाठावी लागतात. रस्त्याअभावी गरोदर महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला होता. आणखी किती जणींचा मृत्यू झाल्यावरच येथे रस्ता होणार का, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.
किती वर्षे रस्त्यांना वनवास आम्ही भोगायचा? रस्त्याविना गरोदर महिलांना प्राण गमवावे लागतात. पाण्याचा प्रश्न आहे. रस्ता नसल्याने मुलींना शिक्षण बंद करावे लागते. 10 रुपयांचे रेशन आणण्यासाठी 10 किलोमीटर पायपीट करावी लागते. आम्हाला रस्ते, वीज, पाणी व जगण्याच्या सुविधा मिळाव्यात.
- ताई पांडुरंग देवणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.