esakal | इचलकरंजीत वादळी चर्चेनंतर कामांना मुदतवाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Extension Of Work After Discussion In Ichalkaranji Kolhapur Marathi News

वादळी चर्चेनंतर आरोग्य विभागाकडील विविध तीन कामांना वार्षिक मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या पालिका सभेत घेण्यात आला.

इचलकरंजीत वादळी चर्चेनंतर कामांना मुदतवाढ

sakal_logo
By
पंडित कोंडेकर

इचलकरंजी : वादळी चर्चेनंतर आरोग्य विभागाकडील विविध तीन कामांना वार्षिक मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या पालिका सभेत घेण्यात आला. ग्रामस्थांना विश्‍वासात घेऊन दूधगंगा योजना मार्गी लावण्याचा निर्धारही यावेळी केला. श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. 

महासत्ता चौकाच्या रुंदीकरणाच्या प्रलंबित प्रश्‍नांवर नगरसेविका संगीता आलासे यांनी लक्षवेधी मांडली. या संदर्भात चार दिवसांत बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्‍वासन मुख्याधिकारी शरद पाटील यांनी दिले. दूधगंगा योजनेसंदर्भातील विषयावर नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनी विवेचन केले. जॅकवेलसाठी जागा खरेदी, पाणीसाठी राखीव ठेवणे, डीपीआर शासनाकडे पाठविणे, पालिका हिस्सा भरण्यास मान्यता देणे आदी विषयांना सभागृहाने एकमुखाने मान्यता दिली. कोणतेही राजकारण न करता ग्रामस्थांना विश्‍वासात घेऊ न ही योजना मार्गी लावण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

पुढील वर्षातील कर आकारणी ही भाडेमूल्यावरच करण्याचा निर्णय सभागृहात घेण्यात आला. 
पालिका शाळांच्या इमारती तीन शैक्षणिक संस्थांना भाडेतत्त्वावर दिल्या असून, त्यांना मुदतवाढ देण्याचा विषय सभागृहासमोर होता. याबाबत मतभेद असतानाही हा विषय सभागृहात मंजूर केला. आधार केंद्र व ई सेवा केंद्रासाठी शाहू हायस्कूलमधील जागा देण्यास सभागृहाचा तीव्र विरोध झाला.

नगरसेवक राजू बोंद्रे यांनी अपंग लाभार्थीस आरक्षित गाळा देण्यास विलंब करीत असल्याबद्दल मिळकत व्यवस्थापक सी. डी. पवार यांना धारेवर धरले. यावेळी गंभीर आरोपही त्यांनी केला. 
आरोग्य विभागातील तीन कामांना वार्षिक मुदतवाढ देण्याचा विषय सभागृहात गाजला. तिन्ही कामे बोगस असल्याचा आरोप नगरसेवक शशांक बावचकर यांनी केला. मुदवाढ देण्याऐवजी नवीन निविदा का काढल्या नाहीत, असा संतप्त सवाल केला.

नगरसेवक मंगेश कांबुरे, युवराज माळी, रुपाली कोकणे यांनी सारण गटारींची सफाई केली जात नसल्याची तक्रार केली. आरोग्य सभापती संजय केंगार यांनी स्वच्छ सर्वेक्षण सुरु असल्याने यापुढे पारदर्शक काम केले जाईल, तसेच नगरसेवकांच्या शिफारशीनंतरच बिल आदा केले जाईल, अशी हमी दिली. त्यानंतर या कामांना मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला. 

भटक्‍या कुत्र्यांचा सातारा पॅटर्न 
शहरातील भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यावर प्रमुख उपाय असलेल्या निर्बीजीकरणाचा परिणाम दिसत नाही. त्यामुळे सातारा येथील संस्थेकडून भटकी कुत्री पकडून ती जंगलात सोडण्याचा निर्णय पालिका सभेत घेण्यात आला, तर मोकाट जनावरांसाठी गोशाळा सुरु करण्यासाठी जागा देण्याचाही निर्णय सभागृहात झाला. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

loading image