family dispute over agri land distribution brother killed brother crime kolhapur police
family dispute over agri land distribution brother killed brother crime kolhapur policeEsakal

Kolhapur Crime : दहा गुंठे जमिनीसाठी चुलत भावाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

हालसवडेतील घटना : शेत जमिनीच्या वाटणीवरून भाऊबंदकीच्या वाद

सांगवडेवाडी : हालसवडे येथील वडिलोपार्जित शेत जमिनीच्या वाटणीवरून भाऊबंदकीच्या वादातून शनिवारी रात्री चुलतभावाचाच कुऱ्हाडीचे घाव घालून व धारदार हत्याराने सपासप वार करून खून करण्यात आला. श्रीमंत पांडुरंग कांबळे (५१, रा. हालसवडे, ता. करवीर) असे खून झालेल्याचे नाव आहे.

घटनेची माहिती मिळताच गोकुळ शिरगाव पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पाच संशयितांवर गुन्हा दाखल केला. त्यापैकी चौघांना अटक करण्यात आली. ही घटना मृत श्रीमंत कांबळे यांच्या घरासमोरच घडली.

मोहन दशरथ कांबळे, रघुनाथ दशरथ कांबळे, वैभव नामदेव कांबळे अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत, तर संशयित आरोपी दशरथ रुद्राप्पा कांबळे हा पसार आहे. याशिवाय एक विधी संघर्ष बालक (सर्व रा. हलसवडे, ता. करवीर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पाच ते सहा जणांनी केलेल्या हल्ल्यात विनोद जनार्दन देसाई (४०) आणि मृताचा मुलगा ऋतुराज श्रीमंत कांबळे हेही जखमी झाले. याप्रकरणी जखमी ऋतुराज कांबळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. एकाच कुटुंबातील भाऊबंदकीतील या घटनेमुळे दोन्हीकडील नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, श्रीमंत कांबळे आणि संशयित आरोपी हे सख्खे चुलतभाऊ आहेत. त्यांची हालसवडे परिसरात वडिलोपार्जित शेतजमीन आहे. त्यापैकी दहा गुंठे जमिनीचा वाद न्यायालयात सुरू आहे. गेली कित्येक वर्ष सुरू असलेल्या या वादाचे पर्यवसान काल रात्री खुनामध्ये झाले.

श्रीमंत कांबळे यांचा मुलगा रोहित हा शनिवारी शेतामध्ये गेला होता. यावेळी संशयित दशरथ कांबळे यांची मुले तेथे खासगी मोजणी करत होते. रोहन याने, ‘तुमची जमीन मोजा आमची मोजायची नाही,’ असे त्यांना सांगितले. यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास शेजारीच राहणाऱ्या श्रीमंत कांबळे यांच्यावर दशरथ कांबळे आणि त्यांच्या मुलांनी कुऱ्हाडीचे घाव घालून व धारदार हत्याराने सपासप वार करून खून केला.

त्यावेळी तेथे असलेला मुलगा ऋतुराज आणि विनोद देसाई त्यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही संशयितांनी हल्ला केला. रात्री अचानक घडलेल्या या हल्ल्यामुळे हालसवडे परिसरात खळबळ उडाली. गोकुळ शिरगाव पोलिसांनी गावात बंदोबस्त ठेवला आहे.

वादाचे पर्यवसान खुनात

श्रीमंत कांबळे आणि दशरथ कांबळे हे सख्खे चुलत भाऊ हालसवडे येथे शेजारी राहतात. गेली अनेक वर्षे त्यांच्यात वडिलोपार्जित जमिनीचा वाद आहे, मात्र, हा वाद खुनापर्यंत जाईल, असे कोणालाही वाटले नव्हते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com