esakal | उपसाबंदी प्रश्नी शेतकऱ्यांची "पाटबंधारे'वर धडक 

बोलून बातमी शोधा

Farmers Angry Against Irrigation Department In Gadhinglaj Kolhapur Marathi News

गडहिंग्लज पाटबंधारे उपविभागाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. चित्री प्रकल्प व नदीत पाणी असूनही अचानक कोल्हापुरातून उपसाबंदी लावून शेतकऱ्यांवर अन्याय केला असून तत्काळ हा आदेश मागे घ्यावा, अशी मागणी आज शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने केली.

उपसाबंदी प्रश्नी शेतकऱ्यांची "पाटबंधारे'वर धडक 

sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज : गडहिंग्लज पाटबंधारे उपविभागाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. चित्री प्रकल्प व नदीत पाणी असूनही अचानक कोल्हापुरातून उपसाबंदी लावून शेतकऱ्यांवर अन्याय केला असून तत्काळ हा आदेश मागे घ्यावा, अशी मागणी आज शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने केली. या अचानकच्या उपसाबंदीवर शेतकऱ्यांनी आज पाटबंधारे कार्यालयावर धडक मारुन संताप व्यक्त केला. दरम्यान, शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ येणार असल्याची पूर्वकल्पना देवूनही शाखा अभियंता गैरहजर राहिल्याने संतापात भर पडली. 

यापूर्वी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उपसाबंदी न करण्याचा निर्णय झाला होता. परंतु, त्यानंतर या समितीची बैठक न घेताच 3 एप्रिल रोजी उपसाबंदी जाहीर केली आहे. शेतकऱ्यांनी अलीकडेच उसाची रोपे व उसाची भरणी केली आहे. काही शेतकऱ्यांनी उसाला लागवडही टाकली आहे. आता या पिकाला पाण्याची गरज आहे. परंतु अचानक उपसाबंदीमुळे शेतकऱ्यांना मोठा याचा फटका बसला आहे. आठ महिने शेतकऱ्यांनी घेतलेले कष्ट या निर्णयाने आठ दिवसात वाया जाणार आहेत. यामुळे तत्काळ उपसाबंदी हटवावी, अशी मागणी आहे. 

सन 2012 पर्यंत कधीही हिरण्यकेशी नदीवर उपसाबंदी झाली नाही. परंतु, 2013 पासून शाखा अभियंता तुषार पोवार यांनी उपसाबंदी लादण्याचे काम केले. त्यानंतर 2019-20 मध्ये उपसाबंदी न करण्याचा प्रयोग आमदार राजेश पाटील यांच्या समवेत बैठकीत केला. तो यशस्वीही झाला आहे. आज चित्रीमध्ये अजून एक टिएमसी पाणी शिल्लक असतानाही केवळ आपल्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी पाटबंधारेने अचानक उपसाबंदी केली आहे.

आज (ता. 5) सायंकाळपर्यंत तत्काळ कृषी पंपांचा वीजपुरवठा सुरू करावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या भाषेतच पाटबंधारेला उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे. माजी सभापती अमर चव्हाण, बसवराज मुत्नाळे, अनिकेत कोणकेरी, बाळगोंडा पाटील, दयानंद पट्टणकुडी, सचिन जाधव, शेखर मोळदी, अजित कोरी, प्रमोद धनवडे, राजू भोई, सागर ग्वाडी, संतोष चौगुले, उदयकुमार चौगुले, भीमा भोई, संभाजी चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने पाटबंधारेला निवेदन सादर केले. 

कार्यभार काढून घ्या... 
या वेळी चव्हाण म्हणाले, ""पोवार यांची रितसर बदली झाली आहे. या जागेवर नवीन अधिकारी रुजू होवूनही अद्याप पोवारांकडेच येथील चार्ज आहे. उपअभियंता कदम यांच्यासह पोवारही जागेवर नसतात. यामुळेच पाण्याचे नियोजन बिघडले आहे. पूर्वकल्पना देवूनही आज पोवार यांनी शेतकऱ्यांसमोर येण्याचे टाळले आहे. त्यांचा येथील शाखेचा अतिरिक्त कार्यभार आठ दिवसात काढून घ्यावा आणि हजर अधिकाऱ्याकडे रितसर चार्ज द्यावा, अन्यथा सर्व शेतकरी उपोषणला बसणार आहेत.'' 

संपादन - सचिन चराटी

kolhapur