

इचलकरंजी : येथील आसरानगरमध्ये असलेल्या कचरा डेपोला बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या भोवती असलेला कचरा मोठ्या प्रमाणात पेटला. त्यामुळे आगीचा मोठा भडका उडाला. महापालिकेच्या अग्निशमन दलाने तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. त्यासाठी चार बंबातून पाण्याचा मारा करण्यात आला. मात्र, यामुळे घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाला मोठी झळ बसली. मशिनरीचा बराचसा भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.