फ्लॅशबॅक; भारतातील पहिल्या बोलपटाचे नायक विठ्ठल अन् कोल्हापूर

flashback special article of sambhaji gandmala master vithal in kolhapur
flashback special article of sambhaji gandmala master vithal in kolhapur

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेने देशभरातील विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववानांना कोल्हापुरात निमंत्रित केले आणि त्यांचा यथोचित सन्मान केला. त्याचबरोबर शहरातील कर्तृत्ववानांच्या स्मृती चिरंतन जपल्या जाव्यात, यासाठी विविध रस्त्यांना त्यांची नावे दिली. लक्ष्मीपुरीतील कोंडा ओळीच्या पिछाडीस असणाऱ्या संजीवनी मेडिकल ते आर्या बेकरीपर्यंतच्या मार्गाचे मास्टर विठ्ठल पथ असे नामकरण करण्यात आले. मास्टर विठ्ठल भारतातील पहिल्या बोलपटाचे नायक आणि त्यांचा हा ‘आलमआरा’ चित्रपट १४ मार्च १९३१ ला मुंबईच्या मॅजेस्टिक सिनेमागृहात दिमाखात प्रदर्शित झाला. त्याला आजच (रविवारी) नव्वद वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने या साऱ्या स्मृतींना पुन्हा उजाळा मिळतो आहे.

घोडेस्वारी आणि तलवारबाजीत निपुण असणाऱ्या मास्टर विठ्ठल यांची ‘इंडियन डग्लस’ अशी ओळख. त्यांच्यासह झुबेदा, वाजीदअली खान, जगदीश सेठी, जिल्लोबाई, पृथ्वीराज यांच्या ‘आलमआरा’ मध्ये प्रमुख भूमिका होत्या. ‘टॉकिंग-सिंगिंग- डान्सिंग-फोटो प्ले’ अशी या चित्रपटाची भली मोठी जाहिरात करण्यात आली होती. मुळात मूकपटाच्या जमान्यात ‘आलमआरा’सारखा पहिला बोलपट हे एक अप्रूपच होते. त्यामुळे या बोलपटाला रसिकांनी एवढा प्रतिसाद दिला की, पहिल्याच दिवशी ‘आलमआरा’ची तिकिटे बाजारात मूळ किमतीपेक्षा वीसपट अधिक भावाने विकली गेली होती.

मास्टर विठ्ठल त्या काळात सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते ठरले होते. १९२४ मध्ये मुघल नर्तिकेच्या रूपात ‘कल्याण खजिना’ चित्रपटातून पहिल्यांदा पडद्यावर आले. मूकपटात अभिनयाने सर्वांना भुरळ घातलेले हेच मास्टर विठ्ठल ‘आलमआरा’चे नायक. त्यावेळी त्यांना करारबद्ध करण्यासाठी अनेक सिनेमा कंपन्यांत चढाओढ झाली. एखाद्या अभिनेत्याला करार करून आपल्या चित्रपटासाठी पसंती देणे आणि प्रसंगी त्यासाठी दोन कंपन्यांचा वाद कोर्टात जाणे, अशा घटना भारतीय सिनेसृष्टीत पहिल्यांदा घडल्या त्या मास्टर विठ्ठल यांच्यासाठीच.

खरं तर ‘छत्रपती संभाजी’, ‘नेताजी पालकर’, ‘बहिर्जी नाईक’, ‘मोहिनी’, ‘सासूरवास’, ‘जय भवानी’, ‘शिलंगणाचं सोनं’, ‘मीठभाकर’, ‘सूनबाई’, ‘छत्रपती शिवाजी’, ‘पावनखिंड’, ‘नायकिणीचा सज्जा’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘साधी माणसं’ असे अनेक चित्रपट त्यांच्या अभिनयाने समृद्ध झाले. १९६६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘शोधा म्हणजे सापडेल’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.

आठवणी आजही ताज्या...

मास्टर विठ्ठल राहायला लक्ष्मीपुरीतील कोंडा ओळीच्या पिछाडीस असलेल्या गल्लीत. त्यांची येथे चाळ होती. त्यामुळे कुटुंबीयांसह कलाप्रेमींनी या मार्गाला त्यांचे नाव देण्याची मागणी करताच महापालिकेने या रस्त्याचे मास्टर विठ्ठल पथ असे नामकरण केले; मात्र नव्या पिढीला त्याची माहिती नाही आणि साधा एखादा चांगला फलकही येथे नसल्याचे चंद्रकांत चव्हाण सांगतात. मास्टर विठ्ठल यांनी अखेरचा श्‍वासही कोल्हापुरातच घेतला. उतारवयातही सायकलवरून त्यांची आवर्जुन भेट व्हायची. सकाळी कपिलतीर्थात भाजी घेतल्यानंतर एका हॉटेलात चहा, त्यानंतर करवीर नगर वाचन मंदिरात वृत्तपत्र वाचन करून ते घरी परतायचे, अशी आठवण दिग्दर्शक चंद्रकांत जोशी सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com