
प्रवीण देसाई
कोल्हापूर : नागरिकांच्या सोयीसाठी केलेली ‘एक जिल्हा एक नोंदणी’ ही योजना सुरू होऊन महिना उलटला आहे, परंतु दस्त नोंदणीतील अनियमितता व गैरप्रकारांमुळे या योजनेच्या अंमलबजावणीबाबतच साशंकता निर्माण झाली आहे. अनेक लोकप्रतिनिधी, संघटनांनी ही बाब पुराव्यानिशी सरकारच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार दस्त नोंदणीकरिता ‘मुद्रांक व नोंदणी’ विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत. याबाबतचे शासन परिपत्रक नुकतेच प्रसिध्द करण्यात आले. याची काटेकोर अंमलबजावणी न केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कडक कारवाई होणार आहे.