esakal | गडहिंग्लजला 50 जणांच्या उपस्थितीत काळभैरी यात्रा

बोलून बातमी शोधा

Gadhinglaj Kalbhairi Yatra Kolhapur Marathi News

महाराष्ट्र-कर्नाटकातील अडीच लाखाहून अधिक भाविकांच्या हजेरीत होणारी येथील ग्रामदैवत श्री काळभैरव देवाची यात्रा कोरोना निर्बंधामुळे अवघ्या 50 जणांच्या उपस्थितीत झाली.

गडहिंग्लजला 50 जणांच्या उपस्थितीत काळभैरी यात्रा
sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज : महाराष्ट्र-कर्नाटकातील अडीच लाखाहून अधिक भाविकांच्या हजेरीत होणारी येथील ग्रामदैवत श्री काळभैरव देवाची यात्रा कोरोना निर्बंधामुळे अवघ्या 50 जणांच्या उपस्थितीत झाली. यात्रेचे सर्व धार्मिक विधी पारंपारिक पद्धतीने उत्साहात झाले. दरम्यान, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने डोंगरावरील काळभैरी मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते बंद केल्याने डोंगर परिसरात शुकशुकाट होता. 

रविवारी रात्री बारा वाजता प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली. या वेळी मंदिराचे पुजारी अश्‍विन गुरव, खातेदार सुधीर पाटील, किरण डोमणे, अशोक खोत, विश्‍वास खोत, सुनिल गुरव, सुरेश गुरव यांच्यासह सर्व मानकरी, गुरव, प्रविण गुरव, सौरभ गुरव उपस्थित होते. 

पहाटे पाच वाजता मंदिरासमोरील दिपमाळ प्रज्वलीत करण्यात आली. पुजारी अश्‍विन गुरव व सहकाऱ्यांनी सर्व धार्मिक विधी पारंपारिक पद्धतीने केल्या. देवाची पूजा अश्‍वारुढ रुपात बांधली होती. दुपारी बारा वाजता आरती करुन पालखीसह मंदिराभोवती सबिना फिरला. काळभैरी...बाळभैरी...भैरीच्या नावानं चांगभलं चा जयघोष आणि वाद्यांच्या गजरात हा सबिना फिरला. सायंकाळी गाऱ्हाणे घातल्यानंतर पालखी शहरातील मंदिराकडे येण्यास निघते. त्यानंतर यात्रेची सांगता होते. 

दरम्यान, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी डोंगर परिसरात भाविकांची गर्दी होवू नये यासाठी पोलिसांनी सर्व रस्ते अडविले होते. बड्याचीवाडी, एमआयडीसी, मंदिर प्रवेशद्वार, शेंद्रीतून येणारी पायवाट, पालखी मार्ग व कर्नाटकातून डोंगराकडे येणाऱ्या रस्त्यावर बॅरेकेटींग लावून बंद केले होते. प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा छावणी मारुन बंदोबस्त तैनात होता. यामुळे डोंगर व मंदिर परिसरात शुकशुकाट जाणवला. दर्शन रांगेच्या पायऱ्याही ओस पडल्या होत्या. छोटे कापूर-साखरेचेही दुकान नव्हते. खबरदारी म्हणून अत्यावश्‍यक सेवेची वाहने व कर्मचारी मंदिरस्थळी हजर होते. 


बॅरेकेटींग उखडले... 
गडहिंग्लज पोलिसांनी पहिल्यांदा तवंदी घाट ते बहिरेवाडी या मुख्य रोडवरुन डोंगराकडे येण्यासाठी असलेल्या वळणावर कर्नाटक हद्दीत बॅरेकेटींग लावले. परंतु, कर्नाटकातील गावच्या काही नागरिकांनी हे बॅरेकेटींग उखडून टाकले. आज सकाळी याची माहिती मिळताच पोलिसांची धावपळ उडाली. त्यानंतर तेथील बॅरेकेटींग काढून हडलगे व मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर महाराष्ट्र हद्दीत लावले. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur