esakal | "सिटी सर्व्हे'कडून नागरिकांची अडवणूक

बोलून बातमी शोधा

Gadhinglaj People Suffer Pendancy in "City Survey." Office Kolhapur Marathi News

गडहिंग्लज येथील भूमीअभिलेख कार्यालयाकडून (सिटी सर्व्हे) तालुक्‍यातील सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक सुरू आहे. किरकोळ कामासाठीही नागरिकांना वर्षानुवर्षे प्रतिक्षा करावी लागत आहे.

"सिटी सर्व्हे'कडून नागरिकांची अडवणूक

sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज : येथील भूमीअभिलेख कार्यालयाकडून (सिटी सर्व्हे) तालुक्‍यातील सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक सुरू आहे. किरकोळ कामासाठीही नागरिकांना वर्षानुवर्षे प्रतिक्षा करावी लागत आहे. या कार्यालयाला शासनाचे कोणतेच नियम लागू नसल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिकांना नडविण्याचे प्रकार वाढतच असल्याचा आरोप करत आज राष्ट्रवादी व जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून कार्यालयासमोरच ठिय्या मांडला. दरम्यान, या कार्यालयाच्या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ गुरूवारी (ता. 20) धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, नगरसेवक हारूण सय्यद, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रामगोंडा उर्फ गुंडू पाटील, गोडसाखर संचालक सागर हिरेमठ यांनी आज दुपारी अचानकपणे आंदोलन सुरू केले. दरम्यान, आज कामानिमित्त कार्यालयात आलेल्या नागरिकांच्या समस्याही या वेळी आंदोलकांनी जाणून घेतल्या.

प्रत्येकांनी आपापल्या कामासाठी सहा महिन्यांपासून वर्षापर्यंत हेलपाटे या कार्यालयाला मारत असल्याचे सांगितले. यातील काही कामे एका दिवसात तर काही नियमानुसार सात ते पंधरा दिवसात होणारी होती. परंतु, त्यासाठी नागरिक वर्षानुवर्षे प्रतिक्षेत असल्याचे स्पष्ट होताच आंदोलक आक्रमक झाले. शिरस्तेदार महाजन व इतर उपस्थित कर्मचाऱ्यांवर आंदोलकांनी प्रश्‍नांची सरबत्ती करून त्यांना धारेवर धरले. या वेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कारभाराविरोधात घोषणा देवून परिसर दणाणून सोडला. 

दरम्यान, भूमीअभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक सिद्धेश्‍वर घुले यांच्याशी आंदोलकांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला. परंतु, ते आजऱ्यात होते. प्रलंबित कामासंदर्भात नागरिक कार्यालयात आल्याचे सांगितले तरी या अधिकाऱ्यांकडून सहकार्याची भूमिका मिळाली नसून समाधानकारक उत्तरे दिली नसल्याची तक्रार करत त्यांच्यावर कारवाईची मागणी आंदोलकांनी निवेदनाद्वारे केली. या कार्यालयाकडे विधवा, आजी-माजी सैनिक, पूरग्रस्तांची वारसा नोंदीची कामे आणि पोटहिस्सा मोजणीची कामे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.

कामासंदर्भात अधिकाऱ्यांची सहकार्याची भूमिका नसते. कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडूनही नागरिकांना हेलपाटे मारण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे. अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा शहरासह तालुक्‍यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांतर्फे गुरूवारी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जिल्हा भूमीअभिलेख अधिक्षकांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. बाळेश नाईक, हारूण सय्यद, रामगोंडा पाटील, गोडसाखर संचालक सागर हिरेमठ, शिरीष देशपांडे, दत्तात्रय पाटील, शंकर माने, अमित माने, श्रीमती मालू कोडले, शशिकांत देसाई, त्रिशूल पाटील, बाबुराव पाटील, समीर बेडक्‍याळे, दत्तात्रय वाइृंगडे, चंद्रकांत कुट्रे, शंकर कांबळे, सुरेश केसरकर, विजय पोवार, शकील मुल्ला उपस्थित होते. 

वारसा नोंदीला सहा महिने 
गडहिंग्लज येथील अमित माने या भारतीय सैन्यदलातील सैनिकाने वारसा नोंदीसाठी भूमीअभिलेख कार्यालयाकडे अर्ज दिला आहे. गेली सहा महिने त्यांचे काम प्रलंबित आहे. त्यासाठी ते तीनवेळा सुट्टी घेवून गडहिंग्लजला आले. तरीसुद्धा कामाचा पत्ता नाही. आज नेमके आंदोलनावेळीच ते आले होते. त्यांनीसुद्धा आंदोलनात सहभागी होत कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. 

वर्षानंतर प्रॉपर्टी कार्ड हातात 
नेसरीतील एका महिलेने प्रॉपर्टी कार्ड मागणीसाठी अर्ज केला आहे. त्यासाठी ती महिला 25 किलोमीटरचा प्रवास करून गेले वर्षभर या कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहे. परंतु अजूनही काम होत नसल्याचे तिने आज आंदोलनावेळी सांगितले. दरम्यान, आंदोलन सुरू असतानाच तिचे प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. आंदोलन संपताच तिच्या हातात प्रॉपर्टी कार्ड दिले. यामुळे प्रत्येक कामासाठी आता आंदोलनच करायची वेळ येणार का, याची चर्चा या तत्पर सेवेवरून सुरू होती.