अध्यक्ष-उपाध्यक्षच ‘गोडसाखर’च्या दिरंगाईस जबाबदार : डॉ. शहापूरकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अध्यक्ष-उपाध्यक्षच ‘गोडसाखर’च्या दिरंगाईस जबाबदार : डॉ. शहापूरकर

अध्यक्ष-उपाध्यक्षच ‘गोडसाखर’च्या दिरंगाईस जबाबदार : डॉ. शहापूरकर

गडहिंग्लज : गडहिंग्लज कारखाना चालविण्यास देण्याबाबत अध्यक्ष-उपाध्यक्ष संचालक मंडळाला विश्‍वासात न घेता कारभार करीत आहेत. खासगी अर्थसहाय्य उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे. अशाने कारखाना चालविण्यास देण्यात दिरंगाई होत असून, त्याला अध्यक्ष-उपाध्यक्ष जबाबदार आहेत, असा आरोप माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी पत्रकातून केला.

पत्रकात म्हटले आहे, की कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात आल्यानंतर कारखाना उणे नेटवर्थमध्ये असल्याने बँका किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळणे अडचणीचे होते. यामुळे कारखाना भाडेतत्त्‍वावर चालवण्यास देण्याची संचालकांनी आग्रही भूमिका मांडली. मात्र अध्यक्षांनी खासगी अर्थपुरवठा उपलब्ध होणार असल्याचे सांगून संचालक मंडळासमोर निनावी प्रस्ताव सादर केला. हा अर्थपुरवठा आठ-पंधरा दिवसांत होईल, असे सांगत चालढकल केली. कारखान्याच्या ताब्यानंतर पाच महिन्यांनी वार्षिक सभा घेऊन कारखाना भाडेतत्त्‍वावर चालवण्यास देण्याचा ठराव घेतला. त्यानुसार मूल्यांकन वाढवून केलेला ताळेबंद जोडून संचालक मंडळाची मान्यता न घेताच प्रस्ताव दिला. त्यावर आयुक्तांनी १२ मुद्यांवर स्पष्टीकरण मागितले आहे. हे पत्र आणि त्याची माहिती अध्यक्षांनी मागणी करूनही संचालकांना दिली नाही. हा प्रस्ताव मंत्री समितीसमोर गेला असताना काही संचालकांनी विविध मुद्यावर शंका उपस्थित केल्याने सहकार मंत्र्यांनी कारखाना सुरू व्हावा या उद्देशाने आधी संचालकांची सभा घेऊन प्रस्तावावर चर्चा करण्याची सूचना केली. त्यानुसार संचालकांनीही सभेची मागणी केली. परंतु त्यालाही प्रतिसाद नाही. आता दीड महिने लोटले आहेत. संचालक मंडळाची सभाही बोलविली नाही. यावरून कारखाना सुरूच करायचा नाही अशीच इच्छा अध्यक्ष व उपाध्यक्षांची दिसते.

पर्चेसच्या विषयांना विरोध

दरम्यान, आज संचालकांची सभा होती. त्यात कारखान्यासाठी आवश्यक साहित्य खरेदीचे दोन विषय होते. मात्र, आधीच ही खरेदी झाली आहे. अशा मनमानी कारभारास विरोध असल्याचे लेखी पत्र डॉ. शहापूरकर, अनंत कुलकर्णी व सुभाष शिंदे यांनी कारखान्याला दिले.

loading image
go to top