गडहिंग्लजला रोज तयार होणार 100 जंबो ऑक्‍सिजन सिलिंडर

Gadhinglaj Will Produce 100 Jumbo Oxygen Cylinders Daily Kolhapur Marathi News
Gadhinglaj Will Produce 100 Jumbo Oxygen Cylinders Daily Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : वाढत्या कोरोना संसर्गात ऑक्‍सिजनचा तुटवडा जाणवत असल्याचे चिंतेचे वातावरण एकीकडे असतानाच येथील उपजिल्हा रुग्णालयात रोज 100 जंबो ऑक्‍सिजन सिलिंडर भरतील असा प्लान्ट उभारण्याची प्रक्रिया गतीने सुरू असून, ही घटना तालुक्‍याला दिलासा देणारी ठरणार आहे. याशिवाय या रुग्णालयात 30 बेडचे सुसज्ज आयसीयू विभागही कार्यान्वित होत असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयाला समर्पित कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले. त्यासाठी पहिल्या टप्प्यात रुग्णालयातील 58 बेडला ऑक्‍सिजन सुविधा उपलब्ध करून दिली. त्याठिकाणी सध्या गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यातील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 
दरम्यान, दिवसेंदिवस ऑक्‍सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. रोज ऑक्‍सिजन मिळवण्यासाठी रुग्णालयातील अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

ऑक्‍सिजन सिलिंडर घेऊन येणारे वाहन येथे पोहोचेपर्यंत अधिकाऱ्यांना चिंता लागलेली असते. यामुळे कोरोना वॉर्डातील डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांसह रुग्णही मानसिक भीतीच्या छायेत असायचे. या 58 बेडसाठी रोज सध्या 70 ते 80 ऑक्‍सिजन सिलिंडरची गरज भासत आहे. रुग्णांचा आलेख वाढतच आहे. उपलब्ध ऑक्‍सिजनमध्ये अधिक रुग्णांना उपचार देणे अडचणीचे होत असल्याचे समजताच जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून येथील रुग्णालयाला ऑक्‍सिजननिर्मितीचा प्लान्ट मंजूर करून आणला. त्याचे काम गतीने सुरू झाले आहे. याबरोबरच रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर पुन्हा 58 बेड तयार करण्यात येत आहेत. यामध्ये 30 बेडचा आयसीयू विभाग कार्यान्वित होणार आहे. उर्वरित 28 बेड ऑक्‍सिजनचे असतील. आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर्स, हाय फ्लो मशिन्स उपलब्ध होणार आहेत. 

तरीसुद्धा ऑक्‍सिजनची गरज... 
सध्या 58 बेडसाठी रोज 70 ते 80 सिलिंडर लागत आहेत. पुन्हा इतकेच बेड वाढणार आहेत. यामुळे साधारण रोज दीडशे सिलिंडर्सची गरज भासणार आहे. प्लान्टमधून रोज 100 सिलिंडर ऑक्‍सिजन तयार होणार आहे. त्यामुळे उर्वरित 50 भर सिलिंडर्स पुन्हा बाहेरूनच मागवून घ्यावी लागणार आहेत. 

शंभरहून अधिक बेड तयार होतील
उपजिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूस हा प्रकल्प उभारत आहे. सध्या पाया मजबुतीकरणाचे काम सुरू असून, येत्या पंधरवड्यात हा प्लान्ट कार्यान्वित होणार आहे. आयसीयू विभागही कार्यान्वित होईल. थोड्याच दिवसांत कोरोना रुग्णांसाठी येथे शंभरहून अधिक बेड तयार होतील.' 
- डॉ. डी. एस. आंबोळे, वैद्यकीय अधीक्षक 

दृष्टिक्षेपात कोरोना हॉस्पिटल... 
- कार्यरत बेड : 58 (ऑक्‍सिजनसह) 
- दुसऱ्या टप्प्यातील बेड : 58 
- त्यात ऑक्‍सिजन बेड : 28, आयसीयू 30 बेड 
- ऑक्‍सिजन प्लान्टचा खर्च : 56 लाख 
- रोज 100 जंबो सिलिंडर भरणार 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com