Football : खेळ कोल्हापुरात अन् फुटबॉल केंद्र पुण्यात

संस्थान काळापासून कोल्हापूरकरांच्या नसानसांत कुस्ती आणि फुटबॉल खेळ खोलवर रुजला आहे. कुस्ती मागे पडली आणि पेठापेठांमध्ये फुटबॉल संघ आणि खेळाडूंची खाण अजूनही सुरूच आहे.
Football
FootballSakal

- सचिन भोसले

संस्थान काळापासून कोल्हापूरकरांच्या नसानसांत कुस्ती आणि फुटबॉल खेळ खोलवर रुजला आहे. कुस्ती मागे पडली आणि पेठापेठांमध्ये फुटबॉल संघ आणि खेळाडूंची खाण अजूनही सुरूच आहे. अशा फुटबॉलवेड्या शहराला कधीकाळी क्रीडा प्रबोधिनीचे कुस्ती आणि फुटबॉल केंद्र मंजूर झाले होते. त्यापैकी फक्त कुस्तीचे केंद्र सुरू असून, फुटबॉल केंद्र कुणालाही समजण्याआधीच पुण्याला हलविले. त्यामुळे यंदाही फुटबॉलचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळवण्यासाठी स्थानिक विद्यार्थी खेळाडूंना पुणे गाठावे लागणार आहे.

कुस्तीबरोबर फुटबॉलही हृदयात

कुस्तीसाठी कोल्हापूरचा डंका जगभरात प्रसिद्ध आहे. त्यात छत्रपती राजाराम महाराजांच्या फुटबॉल प्रेमामुळे फुटबॉलला राजाश्रय मिळाला. त्यानंतर आजतागायत कुस्तीसोबत फुटबॉल खेळालाही येथील स्थानिकांच्या हृदयात स्थान आहे. कुस्तीसाठी राष्ट्रीय खेल प्राधिकरण (साई) ची चार केंद्रे आहेत. त्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्तीपटू घडले जात आहेत.

मात्र, फुटबॉल खेळ आणि तो पाहण्यासाठी दहा हजारांहून अधिक प्रेक्षकांची फुटबॉल हंगामात छत्रपती शाहू स्टेडियममध्ये हजेरी असते. पेठापेठांमध्ये फुटबॉल प्रत्येक घरातील युवक, युवती संघातून खेळत आहेत. तरीसुद्धा फुटबॉलचे अयावत प्रशिक्षण केंद्र, तेही क्रीडा प्रबोधिनीच्या रूपाने पुण्यातील बालेवाडीमध्ये आहे.

२८ वर्षांपूर्वी मंजुरी

खरे पाहता १६ जुलै १९९६ रोजी तत्कालीन सरकारने कोल्हापूरच्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये कुस्ती आणि फुटबॉल निवासी प्रशिक्षण केंद्रास मंजुरी दिली. त्यानंतर काही दिवस आंतरराष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षक जयदीप अंगीरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू तयार झाले. काही दिवस हे प्रशिक्षण छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सुरू राहिले.

शिवाजी पाटील, शरद माळी, संभाजी जाधव, प्रा. अमर सासने यांनी प्रशिक्षण दिले. मात्र, क्रीडा व युवा सेवा संचालनालयाने ते पुण्याला हलविले. तंत्रशुद्ध फुटबॉलचे प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या मुलांकरिता क्रीडा विभागाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. यासाठी क्रीडा मार्गदर्शक पदही मंजूर आहे.

मंजूर असलेले क्रीडा प्रबोधिनीचे निवासी फुटबॉल केंद्र पूर्ववत सुरू करावे. जेणेकरून १२, १७ वयोगटांतील मुला-मुलींना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखविण्याची संधी मिळेल. राज्य शासनाने याचा विचार करून त्वरित कार्यवाही करावी.

- विकास पाटील, माजी राष्ट्रीय फुटबॉलपटू, कोल्हापूर

खेळाडूंच्या मागणीनुसार वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करून हे केंद्र कोल्हापूरसाठी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करू.

- माणिक पाटील, क्रीडा उपसंचालक, कोल्हापूर विभाग

प्रबोधिनीतून निखिल, अनिकेत झाले तयार

याच क्रीडा प्रबोधिनीत लहानपणी प्रवेश घेतलेल्या निखिल कदमने भारतीय संघ आणि आघाडीच्या आय लीग संघात प्रवेश केला आणि मैदानही गाजविले. २०१७ मध्ये भारतात झालेल्या फिफा युवा विश्‍वचषक स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळवलेला कोल्हापूरचा अनिकेत जाधवसुद्धा याच क्रीडा प्रबोघिनीचा खेळाडू आहे. त्यामुळे हे केंद्र कोल्हापुरात व्हावे, यासाठी अनेक आजी-माजी खेळाडूही प्रयत्न करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com