काँग्रेसच्या एकजुटीचा महाडिकांना शह: तीन दशकांच्या एकहाती सत्तेला लावला सुरूंग

काँग्रेसच्या एकजुटीचा महाडिकांना शह: तीन दशकांच्या एकहाती सत्तेला लावला सुरूंग

कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणात ज्या काँग्रेसमधील अंतर्गत सत्तास्पर्धेतून माजी आमदार महादेवराव महाडिक (Former MLA Mahadevrao Mahadik)यांचे नेतृत्व उदयास आले, त्याच काँग्रेसच्या एकजुटीतून त्यांच्या राजकीय कारकिर्दीलाच शह देण्याचे काम गेल्या पाच-सहा वर्षांत झाले. त्यांच्यासह आमदार पी. एन. पाटील (MLA P. N. Patil)आणि ‘गोकुळ’(Gokul dudh sangh)चे माजी ज्येष्ठ संचालक अरुण नरके (Director Arun Narke) यांच्या 'मनपा' (Municipal Corporation kolhapur)युतीचेही वर्चस्व संपुष्टात आले.

Gokul dudh sangh kolhapur Political article marathi news

साधारण १९९० च्या सुमारास महाडिक यांचा जिल्ह्यातील राजकारणाचा प्रवेश हा गोकुळमधून झाला. त्याच वर्षी गोकुळच्या अध्यक्षपदावरून (कै.) आनंदराव पाटील-चुयेकर यांना हटवून पी. एन.-महाडिक यांनी नरके यांना बसवले. त्याच दरम्यान महापालिकेचे नेतृत्व तत्कालीन राज्यमंत्री (कै.) श्रीपतराव बोंद्रे करत होते. बोंद्रे यांनी महापालिकेची सत्ता महाडिक यांच्या हातात पहिल्यांदा दिली. तेथून . महाडिक यांच्या नेतृत्वाला अधिकच बहर येत गेला. तेव्हापासून अलीकडच्या पाच-सहा वर्षांपर्यंत अपवाद वगळता महाडिक यांची मदत सर्वांनीच घेतली आणि त्या बदल्यात महाडिक यांनीही अनेकांची मदत घेऊन जिल्हा परिषद, जिल्हा बँक, महापालिका आणि गोकुळमध्ये आपले राजकीय वर्चस्व ठेवले. या सगळ्याला तत्कालीन काँग्रेसमधील अंतर्गत बंडखोरीचा त्यांना फायदा झाला.

पक्षापेक्षा व्यक्तिगत राजकाणाचा ठसा उमटवताना महाडिक यांनी आपण म्हणेल तोच महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि जिल्हा बँकेत कोणाची सत्ता असावी, याचे नियोजन केले. त्या काळात जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक नावाची मोठी क्रेझ निर्माण झाली होती. ती क्रेझ एवढी होती की, महाडिक यांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी किंवा त्यांना बघण्यासाठीही लोकांची गर्दी व्‍हायची. या जोरावरच त्यांनी १९९५ ची विधानसभा निवडणूक करवीरमधून लढवली. त्यांच्या विराेधात होते तत्कालीन मंत्री (कै.) दिग्विजय खानविलकर.महाडिक यांच्याभोवती असलेले मोठे वलय, सर्व सत्तास्थाने ताब्यात असल्याने त्यांच्या मागे असलेले नेते आणि कार्यकर्त्यांची फळी व मोठी आर्थिक ताकद या जोरावर ते हे मैदान मारतील, अशी शक्यता होती;

पण त्यांना यात पराभव स्वीकारावा लागला; पण पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असल्याने त्यांनी हा पराभव खिलाडू वृत्तीने स्वीकारला असला तरी पुन्हा अशा निवडणुकांचा त्यांनी नादच सोडला. त्याच काळात (कै.) सदाशिवराव मंडलिक, (कै.) बाबासाहेब कुपेकर यांच्यासारख्या नेतृत्वाची फळी उभी राहत होती; पण जिल्ह्यातील सत्तास्थानांत महाडिक यांचाच वरचष्मा राहिला.

कोल्हापूर महापालिकेत महाडिक गट किंवा ताराराणी आघाडी या नावाने त्यांनी जो काही पॅटर्न राबवला, तो राज्यभर चर्चेत रहिला. निवडून येणाऱ्यांचा गट करून पदांचे वाटप करण्याचा हा पायंडा महापालिकेत पक्षीय राजकारण स्पष्टपणे परतले तोवर सुरू होता. महापालिकेच्या सत्तेने महाडिक यांना वलय दिले. गोकुळने या साम्राज्याला आधार पुरवला, हे सारे चिरे एक एक करत ढासळत गेले.

१९९० आणि १९९५ मध्ये जिल्ह्यात १२ पैकी दहा आमदार काँग्रेसचेच होते. १९९९ मध्ये काँग्रेसचे विभाजन होऊन राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि महाडिक यांच्या नेतृत्वावर मर्यादा आल्या. तरीही स्थानिक स्वराज्य संस्था गटातील विधान परिषदेची पहिली निवडणूक त्यांनी अपक्ष लढवली आणि त्यात काँग्रेसचे उमेदवार वडगावचे माजी नगराध्यक्ष (कै.) विजयसिंह यादव यांचा पराभव केला. या विजयाने पुन्हा एकदा त्यांची ताकद जिल्ह्यात दिसू लागली. त्याच दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी खासदार धनंजय महाडिक, (कै.) मंडलिक यांचे पुत्र खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाची जिल्ह्याच्या राजकारणात एंट्री झाली होती.

महाडिक यांची जिल्ह्यात असलेली ताकद आणि त्यांची भक्कम आर्थिक बाजू यामुळे १९९९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे करवीरमधून तिकीट नाकारलेले पालकमंत्री पाटील त्यांच्या संपर्कात आले. तोपर्यंत तरी महाडिक यांच्या नेतृत्वाला आव्हान देणारा नेता जिल्ह्यात नव्हता. पाच वर्षे पाटील हे महाडिक यांच्या जवळ होते.

करवीरमध्ये त्यांनी घेतलेली चांगली मते आणि त्यांचे सर्वच सत्ताकेंद्रांवर असलेल्या वर्चस्वाचा करवीरमध्ये फायदा करून घेता यावा, हा पाटील यांचा उद्देश होता, त्या बदल्यात २००४ च्या लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी आपला बळाचा पट महाडिक यांचे पुतणे आणि शिवसेनेचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या मागे लावला. थोडक्या मतांनी महाडिक यांचा पराभव झाला. दुसरीकडे पाटील करवीरमध्ये महाडिक गटाच्या साथीसह अपक्ष आमदार झाले.

२००७ मध्ये या दोघांतच वादाची ठिणगी पडली आणि त्यातून पाटील यांनी त्यांच्या एका-एका संस्थानाला धक्के देण्यास सुरवात केली. त्याची पहिली सुरवात महापालिकेत पाटील यांनी तेथे पक्षीय राजकारण सुरू करून काँग्रेसचा महापौर-उपमहापौर करून केली; पण त्यांना शह देण्यासाठी महाडिक यांनी पुतणे धनंजय महाडिक यांनाच त्यांच्या विरोधात रिंगणात उतरवले. महाडिक यांनी त्या वेळी जोरदार ताकद लावून पाटील विजयी झाले. त्यानंतर या दोघांतील संघर्षाला अधिकच धार येत राहिली. हा संघर्ष २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्यानंतर संपेल असे वाटत होते, कारण या निवडणुकीत मंत्री असल्याने आणि पक्षीय बंधनामुळे पालकमंत्री पाटील यांनी धनंजय यांना पाठिंबा जाहीर केला.

लोकसभेत धनंजय विजयी झाले; पण त्यात पाटील यांची मदत न झाल्याचा आरोप त्यांनी केल्याने पुन्हा या दोघांत टोकाचा संघर्ष सुरू झाला. त्याचे पडसाद २०१४ च्या दक्षिणमधील विधानसभेत उमटून पाटील यांना धक्कादायक पराभवात उमटले. येथूनच महाडिक यांच्या विरोधातील पाटील यांच्या संघर्षाला अधिक धार येत गेली. मग विधान परिषदेत महाडिक, लोकसभेत धनंजय यांचा आणि २०१९ च्या विधानसभेत महाडिक यांचे पुत्र अमल यांच्या पराभवापर्यंत हा संघर्ष पोहोचला.

आता उरलंय ‘राजाराम’

ही मोर्चेबांधणी करत असताना ज्या काँग्रेसमधील बंडाळीचा फायदा महाडिक यांना होत होता तोच रोखण्यासाठी पाटील यांनी पहिल्यांदा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा पाठिंबा मिळवला, त्यानंतर महाडिक यांचे विरोधक खासदार मंडलिक यांच्यापासून ते राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार विनय कोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे घटक असलेल्या जवळपास सर्वांना एकत्र करून पाटील यांनी गोकुळचे मैदान मारत श्री. महाडिक यांची उरलीसुरली सत्ताही संपुष्टात आणली. आता कसबा बावडा येथील राजाराम कारखाना हा महाडिक यांच्यासह पाटील यांच्यादृष्टीने महत्त्वाचा असून, त्यातही या दोघांचा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

बलस्थानास हादऱ्याची तयारी

काँग्रेसच्या ताब्यातील जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचा कब्जा झाला होता, जिल्हा परिषदेतील महाडिक यांचे वर्चस्वही संपले होते. आता फक्त गोकुळ आणि राजाराम कारखान्यावर महाडिक यांचा ताबा होता, किंबहुना गोकुळ हेच त्यांचं बलस्थान उरलं होते. लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री पाटील यांनी ‘आमचं ठरलंय म्हणत धनंजय महाडिक यांचा पराभव केला, तर विधानसभेच्या अमल महाडिक यांच्या पराभवानंतर आमचं ठरलंय, गोकुळ उरलंय म्हणून गोकुळचीही मोर्चेबांधणी पाटील यांनी सुरू केली.

देवाण-घेवाणीवर आधारित राजकारण

महाडिक यांनी विशिष्ट शैलीचे राजकारण करत आपली पकड बसवली. त्यांना राज्याच्या राजकारणात कधीच रस नव्हता. विधिमंडळातही कधी त्यांना स्वारस्य दिसले नाही. विधान परिषदेतील आमदारकीचा लाभ त्यांना जिल्ह्यातील सत्तास्थानांवर पकड ठेवण्यासाठीच घ्यायचा होता. महाडिक यांच्याशी सोयीनं निरनिराळ्या पक्षाचे नेते जोडले जात होते. यात उभयपक्षीय राजकीय लाभ हेच सूत्र होते.

महाडिक यांचे राजकारण सत्तेच्या वाटपाच्या सूत्रावरच आधारले होते. यात त्यांना साथ देणाऱ्यांची त्यांनी परतफेड करावी, असा साधा हिशेब होता. त्यामुळे बहुतेक नेत्यांचे त्यांच्याशी मैत्री आणि विरोधाचे चक्र सुरू राहिले. बहुतेक जण कधी ना कधी महाडिक यांच्यासोबत होते आणि महाडिक त्यांना साथ देत होते. यातील पी. एन. पाटील, अरुण नरके वगळता कायमची साथ कोणाची राहिली नाही. देवाण-घेवाणीवर आधारलेल्या या राजकारणात विचार, पक्ष यांचा फारसा संबंध नव्हता.

Gokul dudh sangh kolhapur Political article marathi news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com