Gokul Election: ‘गोकुळ कुणाचं’ प्रयोग सुरू, आता चित्रपट काढा मंत्री सामंत-सतेज पाटील यांच्यात टोलेबाजी; कलाकार आहेत, निर्माता बाहेरचा असावा

Gokul Election, Satej Patil, Uday Samant; गोकुळ निवडणुकीवरून आमदार सतेज पाटील आणि मंत्री उदय सामंत यांच्यात टोलेबाजी रंगली. गोकुळच्या राजकारणावरून दोन्ही नेत्यांनी कार्यक्रमात परस्परांवर टिप्पणी केली.
Kolhapur Gokul election

Kolhapur Gokul election

esakal

Updated on: 

कोल्हापूर: कोल्हापुरात सध्या गोकुळ कुणाचं हा प्रयोग सुरू आहे, तो एकपात्री विरुद्ध नऊपात्री असा असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगताच देऊळबंदनंतर आता गोकुळवर चित्रपट काढायला हवा, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सुचविले. त्यासाठी सर्व कलाकार गोकुळमध्ये आहेत, पण निर्माता बाहेरचा असावा, असे त्यांनी सांगितले.

येथील संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमात आमदार पाटील आणि मंत्री सामंत यांच्यात ‘गोकुळ’च्या निवडणुकीवरून टोलेबाजी रंगली

सामंत हे सामान्यांच्या हृदयात पोहोचणारे मंत्री आहेत, पण त्यांचं लक्ष फक्त रत्नागिरीत असते, असा चिमटा आमदार पाटील यांनी काढला. त्यांनी ‘गोकुळ कुणाचं’ या प्रयोगावर बोलताच मंत्री सामंत यांनी मंत्री हसन मुश्रीफ कोठे आहेत, अशी विचारणा केली. त्यावर आमदार पाटील यांनी ते सध्या गोकुळच्या निवडणुकीसाठी मतदारसंघात धावाधाव करत असल्याचे सांगितले. यावर इथल्या राजकारणात नेमकं काय होतं, हे कुणालाच कळत नाही. निवडणुका आल्या की कोल्हापुरात पळापळी आणि पळवापळवी सुरू असते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक यांच्या नावांचा संदर्भ देत मंत्री सामंत यांनी कोल्हापुरातील कोणती निवडणूक कधी वळण घेईल, हे समजत नाही. मात्र, येथील राजकारणातील खिलाडूवृत्ती अन्य जिल्ह्यात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सतेज पाटील यांची संकटकालीन मदत

रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २४ तासांत अचानक केंद्रीय तपासणी पथक येणार होते. त्यावेळी आमदार सतेज पाटील, डॉ. संजय डी. पाटील यांनी आठ ट्रकमधून वैद्यकीय साधनसामग्री पाठविली. त्या मदतीमुळे या महाविद्यालयाला मंजुरी मिळाली. आमदार पाटील यांची मदत आम्हाला एसटीच्या संकटकालीन दरवाजाच्या मदतीसारखी उपयोगी ठरल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. दिवंगत डॉ. डी. वाय. पाटील दादांचे राजकीय संस्कार आणि यशवंतराव चव्हाण, बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत. गोकुळ निवडणुकीत आमदार पाटील हे विरोधी पॅनेलमध्ये राहतील आणि महायुती म्हणून माझी भूमिका कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

मंगेश चिवटे आमच्या शिवसेनेचे उमेदवार

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपने कोणाला तिकीट दिले, हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. मात्र, मंगेश चिवटे आमच्या शिवसेनेचे उमेदवार असतील, असे मंत्री सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. एमपीएससीबाबत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, त्यांना न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे. राजकीय हेतूने दीपके यांचे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन सुरू असून, त्यात ठाकरे गटाचे कार्यकर्ते सहभागी असल्याची टीका त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com