esakal | 'गोकुळ' मल्टिस्टेटवरून पालकमंत्र्यांचा शिळ्या कढीला ऊत
sakal

बोलून बातमी शोधा

'गोकुळ' मल्टीस्टेट वरून पालकमंत्र्यांचा शिळ्या कढीला ऊत

'गोकुळ' मल्टीस्टेट वरून पालकमंत्र्यांचा शिळ्या कढीला ऊत

sakal_logo
By
स्नेहल कदम

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याचा विषय संघाचे नेते आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी यापूर्वीच वार्षिक सर्वसाधारण सभेत संपवला आहे. परंतु, कालबाह्य झालेला विषय पुन्हा उकरुन काढून पालकमंत्री शिळ्या कढीला ऊत देत 'गोकुळ' च्या सभासदांची दिशाभूल करीत आहेत, या शब्दांत 'गोकुळ' चे अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी प्रत्युत्तर दिले. काल (14) 'गोकुळ' निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर कोल्हापूर दक्षिणमधील ठरावधारकांचा मेळावा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत झाला. या मेळाव्यात पाटील यांनी 'गोकुळ' मल्टिस्टेटवरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. त्याला आपटे यांनी प्रसिध्दी पत्रकातून प्रत्युत्तर दिले.

'गोकुळ' मध्ये सभासदांच्या अडचणींचा जो विषय असेल तो आम्ही घेणार नाही व यापूर्वीही घेतलेला नाही. ज्यांनी मल्टिस्टेटचा विषय सर्वसाधारण सभेत घेतला ते स्वतः त्यांच्या सोबत आहेत. 'गोकुळ' हा शेतकऱ्यांच्या मालकीचा असून शेतक-यांच्या हिताचेच निर्णय 'गोकुळ' मध्ये घेतले जातात. शेतक-यांना आणखी जादा दर देता यावा यासाठीच संघ मल्टीस्टेट करण्याचा मुद्दा पुढे आला होता. आता तो मागे पडला आहे. पण विरोधक शिळ्या कढीला ऊत आणत आहेत, सभासदांनी त्यांची वक्‍तव्ये गांभीर्याने घेवू नये, असे आवाहनही श्री. आपटे यांनी पत्रकात केले आहे.

ज्यांच्या संस्था मल्टीस्टेट आहेत तेच 'गोकुळ' च्या विरोधात बोलत आहेत. हे हास्यास्पद आहे असा आरोपही आपटे यांनी पत्रकात केला आहे. मंडलिक कारखाना मल्टीस्टेट, वारणा दूध संघ मल्टीस्टेट, संताजी घोरपडे खाजगी, बंद पडलेला महालक्ष्मी दूध संघ मल्टीस्टेट होता. या संस्था ज्या नेत्यांच्या आहेत किंवा होत्या, त्या नेत्यांना 'गोकुळ' वर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. सर्वसामान्य सभासदांना आम्ही चांगल्या कारभाराचा विश्‍वास दिला आहे. ते आमच्या सोबत आहेत असा विश्‍वास त्यांनी पत्रकांतुन व्यक्‍त केला आहे.