जयसिंगपुरात "स्टिंग ऑपरेशन'; लेटलतिफांना गुलाबपुष्प देवून गांधीगीरी 

Government employees are not present on time at work in jaysingpur
Government employees are not present on time at work in jaysingpur
Updated on

जयसिंगपूर : सरकारी कर्मचाऱ्यांचा पाच दिवसांचा आठवडा केला. तरीही कार्यालयात उशिरा येणाऱ्या सरकारी बाबूंना गुलाबपुष्प देऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी कर्तव्याची जाणीव करुन दिली. मंगळवारी सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपालिकेसह तलाठी आणि भूमापन कार्यालयात "स्टिंग ऑपरेशन' केले. पालिकेच्या मुख्याधिकारीच सव्वादहापर्यंत आल्या नसल्याने कार्यकर्त्यांनी त्यांच्या दालनाबाहेर दरवाजाबाहेर गुलाबपुष्प ठेवले. यानंतरही बराच काळ कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांची प्रतिक्षा केली. पण त्या आल्या नव्हत्या. 

सामाजिक कार्यकर्ते शंकर नाळे, सागर मादनाईक, चंद्रकांत जाधव, मयूर सावंत, अमित मगदूम, जावेद कासेगावकर, विजय नलवडे आदींनी सकाळी साडेनऊ वाजता पालिकेत प्रवेश केला. पावणेदहा वाजता केवळ चारच अधिकारी पालिकेत उपस्थित होते. वेळेत उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तर पावणेदहानंतर येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही गुलाबपुष्प देऊन नागरिकांच्या कामांसाठी आपण वेळेत पालिकेत उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात आली. वसुली विभागाचे कर्मचारी मात्र वेळेत उपस्थित होते. 

मुख्याधिकारी श्रीमती टिना गवळी याच वेळेत हजर राहिल्या नसल्याने कार्यकर्त्यांनी त्यांनाही गुलाबपुष्प देण्यासाठी प्रतिक्षा केली. सव्वा दहा झाले तरी त्या आल्या नाहीत. त्यांच्या दालनाबाहेर असणाऱ्या महिला शिपायांना केबीनचा दरवाजा उघडण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी त्यास नकार दिला. मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलवर गुलाबपुष्प ठेवून जाणार असल्याचे सांगूनही त्यांनी दरवाजा उघडला नसल्याने अखेर कार्यकर्त्यांनी त्यांच्या दालनाबाहेरच गुलाबपुष्प ठेवून निघून गेले. यानंतरही काही काळ कार्यकर्ते पालिकेसमोर मुख्याधिकाऱ्यांची प्रतिक्षा केली. मात्र, त्या आल्या नव्हत्या. 

नगरपालिकेसमोरील तलाठी कार्यालयाची अवस्थाही वेगळ नव्हती. सव्वा दहा वाजले तरी कार्यालय बंद होते. नागरीक बंद दरवाजा पाहून माघारी जात होते. कार्यकर्त्यांनी तलाठी जाधव यांना मोबाईलवरुन संपर्क साधला असता उमेदवाराला पाठवून देत असल्याचे सांगितले. अखेर कार्यकर्त्यांनी विनंतीपूर्वक चर्चा केल्याने तेही काही काळात कार्यालयात दाखल झाले. यावेळी तलाठ्यांनी याठिकाणची पदे रिक्त असल्याने आपण काय काय करायचे असा उलट प्रश्‍न केला. यावर तुमचे काम काय आणि तुम्ही काय करणार हे आधी सांगा. रिक्त जागांच्या प्रश्‍नावर वरीष्ठांकडे तुम्ही मागणी केला का? रिक्त जागांचा प्रश्‍न वेगळा असून तुम्ही वेळेत उपस्थित राहून लोकांची कामे करा अशी विनंती करण्यात आली. 
 

भूमापन कार्यालय "पास"
नगरपालिकेसमोरील भूमापन कार्यालयातही सामाजिक कार्यकर्त्यांनी "स्टिंग ऑपरेशन' केले. यावेळी पावणे दहा वाजता कार्यालय सुरु होते. अधिकारी लोकांची कामे करताना दिसले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. 
 

तलाठी कार्यालयाची वेळ रात्री कि दिवसा? 
तलाठी कार्यालय वेळेत सुरु नव्हते. तलाठ्याचा पत्ता नव्हता. त्यामुळे कामासाठी बाहेर थांबलेल्या नागररिकांनी कार्यालयाच्या तक्रारींचा पाढा वाचला. तलाठी कार्यालय सायंकाळी सहानंतर सुरु असते. सर्व्हर डाऊनचे कारण पुढे करुन दिवसभर अधिकाऱ्यांचा पत्ता नसतो. रात्री बराच काळ कार्यालय सुरु असते. मोठ्या लोकांच्या कामासाठी रात्री कार्यालय सुरु असते का असा सवाल उपस्थित करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com