esakal | परितेत गर्भलिंग निदान केंद्रावर छापा; एका महिलेसह चौघे ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

crime

परितेत गर्भलिंग निदान केंद्रावर छापा; एका महिलेसह चौघे ताब्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) : करवीर तालुक्यातील परिते-कुरुकली ( Parite- Kurukali) येथे बेकायदा गर्भलिंग निदान (Gestational diagnosis) केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला. पोलिसांनी एका घरावर छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. गर्भलिंग चाचणी करणारे मशिनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. करवीर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. परिते येथील एका घरामध्ये बेकायदा गर्भलिंग चाचणी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी सकाळी ९ वाजता त्या घरावर छापा टाकला. तेथील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. तेथील मशिनही पोलिसांनी जप्त केले. पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

अचानक गावात पोलिस आल्याने खळबळ उडाली. ज्या घरावर पोलिसांनी छापा टाकला त्याच्या समोर ग्रामस्थांनी गर्दी केली. काही वेळात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन कारवाईची माहिती घेतली. त्यानंतर त्या चौघांना करवीर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. दिवसभर त्यांची चौकशी केली. जवळच असणाऱ्या सिरसे गावातील काही व्यक्तींचा यामध्ये समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याचाही तपास पोलिस करत आहेत. हे चौघेच गर्भलिंग तपासणीचे काम करत होते, की यामागे एक टोळी आहे याचाही तपास पोलिस करत आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.कारवाईवेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुवर्णा पाटील, इस्पुर्ली आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. योगिता अग्रवाल, ग्रामविकास अधिकारी ए. डी. तडुळे हे उपस्थित होते.

हेही वाचा: कोकणात धावणाऱ्या 6 रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

आठवड्यातून एकदा तपासणी

या परिसरात दर रविवारी काही जण गर्भलिंग तपासणी करीत असतात. गेले काही महिने हा प्रकार सुरू आहे. परगावाहून लोक तपासणीसाठी येतात. यासाठी एक पथक कार्यरत आहे. राज्य महामार्गाच्या जवळच घरामध्ये तपासणी केली जाते. अशी चर्चा छाप्यानंतर गावकऱ्यांच्यात दबक्या आवाजात सुरू होती.

loading image