निनाच्या चलाखीने हॅकर जाळ्यात 

hacker arrested in chennai
hacker arrested in chennai

जागतिक स्तरावर मार्केट रिसर्च कंपन्या खूप मोठी आर्थिक गुंतवणूक करून बाजारपेठेचे संशोधन करतात. अशा संशोधन कार्यात मार्केट किंवा ग्राहकाबद्दल माहिती गोळा केली जाते. ग्राहकांचे कल, खरेदी विषयक सवयी, बाजारपेठेच्या गरजा, अर्थकारण या सर्व बाबींची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तज्ञ व अनुभवी लोकांकडून अभ्यास व विश्लेषण केले जाते. उत्पादन करणाऱ्या तसेच सेवा पुरवणारे कंपन्या; नवीन उद्योजकांना हा डेटा मोठ्या रकमेस विकला जातो. हा डेटा संकलन करण्यासाठी लक्षणीय खर्च येत असल्याने संशोधनाचा डेटा तयार झाल्यानंतर त्याच्या ई-फाइल्स तयार करून सुरक्षितपणे सर्वर वरती साठवल्या जातात. 
निना मायइन्फो नावाच्या मार्केट रिसर्च कंपनीच्या हैदराबाद येथील मुख्यालयात आय. टी मॅनेजर पदावर कार्यरत होती. अमेरिकन बेस असणाऱ्या या बहुराष्ट्रीय कंपनीची उलाढाल मोठी होती. वेबसाईटच्या माध्यमातून ही कंपनी ग्राहकांना डेटा पूरवीत असे.

त्या रात्री निनाला अचानक फोन आल्यामुळे मुख्यालयात जावे लागले. काही वेळापूर्वी कंपनीची ई-फाईल विकली गेल्याची सूचना सेल टीमला ई-मेल द्वारे आली होती. परंतु विक्री रक्कम जमा झालेली नव्हती. त्यानंतर मीना पोहोचल्यावर कंपनीच्या 6 ई-फाइल्स एका ग्राहकाने हजारो डॉलर्ससाठी विकत घेऊन डाउनलोड केल्याच्या सूचनेचा  मेल आला. परंतु पुन्हा रक्कम जमा झालेली नव्हती. निनाला हा काहीतरी घोटाळा असून हॅकिंगचा प्रकार असल्याचे लक्षात आले. हॅकर आणखी काही फाईल्स सर्वरमधे प्रवेश करून डाऊनलोड करण्याच्या प्रयत्नात होता. पण निना देखील हॅकरला पुरून उरणारी होती. तिने क्षणात सर्वर सिक्युरिटी सिस्टीमचा ताबा घेऊन प्रथम सर्वरकडे येणारे सर्व अनाधिकृत प्रवेशाचे मार्ग बंद केले. त्याचप्रमाणे नीनाने कंपनीचे सर्व कर्मचाऱ्यांना ते जिथे असतील तेथूनच त्यांचा कंपनीतील सिस्टीम मधील लॉगइन आय. डी व पासवर्ड बदलण्यासाठी सांगितले. काही मिनिटातच कंपनीच्या ई-फाईल्स भोवती अभेद्य सायबर कवच तयार झाले. हॅकरला पुन्हा कित्येक तास प्रयत्न करूनही  कंपनीच्या सर्वरमध्ये प्रवेश मिळवता आला नाही. नीनाने बुद्धी चातुर्याच्या जोरावर कंपनीला कोट्यावधी रुपयांची होणारी हानी वाचवली होती. तथापि हॅकरने अनधिकृत प्रवेश करून सिस्टीममधून 6 ई-फाइल्स लंपास केल्या होत्या. हा तोटा देखील लाखो रुपयांचा होता. आतापर्यंत पहाट झाली होती.  इंटरनेट वापरताना प्रत्येक संगणकाला एकमेव असणारा आय. पी ॲड्रेस निर्माण झालेला असतो. त्या आय. पी ॲड्रेस वरून एखादे विशिष्ट कार्य कोणत्या संगणकावरून झाले आहे ते शोधता येते. नीनाने ज्या संगणकावरून कंपनीचा सर्वर हॅक करण्यात येऊन ई- फाईल्स  डाऊनलोड करण्यात आल्या होत्या त्या संगणकाचा आय. पी ॲड्रेस शोधून काढला. मायइन्फो कंपनीच्या वेबसाईट वरती हॅकरने अवघ्या काही तासांपूर्वी भेट देऊन  खोट्या नावाचा यूजर आय.डी तयार केल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर नीनाने हॅकरची तिला मिळालेली माहिती देऊन पोलिसांच्या सायबर सेलकडे कंपनीच्या वतीने हॅकिंगची तक्रार दिली. 

सायबर सेलने हॅकरच्या आय.पी अॅड्रेस वरून इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनीकडून हॅकरची माहिती व पत्ता मागविला. हॅकिंग चेन्नईमधून झाले होते, याची माहिती मिळताच सायबर सेल टिम यंत्रणेसह हैदराबाद पासून सव्वा सहाशे कि.मी. असणाऱ्या चेन्नईमध्ये दाखल झाली. इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनीकडून मिळालेल्या पत्त्यावर छापा टाकण्यात आला. हॅकरला अटक करण्यात येऊन त्याच्या घरातून पेनड्राईव्ह व हार्डडिस्क जप्त करण्यात आली. त्या ठिकाणी रीतसर पंचनामा करण्यात आला. त्या पेनड्राईव्हमध्ये तक्रारदार कंपनीचे सर्वरमधून अनधिकृतपणे डाउनलोड झालेल्या सहा ई-फाइल्स मिळाल्या, हॅकर उच्चशिक्षित व स्वतः रिसर्च ॲनालिस्ट म्हणून झिरो नावाच्या कंपनीत काम करत होता. हे विदारक पण सत्य समोर आलं. हॅकिंगसाठी वापरण्यात आलेला संगणक हा आरोपीच्या कंपनीतील होता. त्यामुळे सायबर सेलने तिथेही सर्च ऑपरेशन करून आरोपी वापरत असलेला संगणक ताब्यात घेतला. त्यामध्ये देखील मायइन्फो कंपनीच्या 6  ई-फाईल्स सापडल्या. त्यावेळी झिरो कंपनीतील कर्मचाऱ्यांचे जबाबही घेण्यात आले. आरोपीकडून हस्तगत केलेले पेनड्राईव्ह, हार्डडिस्क हे फॉरेन्सिक सायन्स लॅब ला पाठवण्यात आले. त्यानंतर आरोपी विरुद्ध हैदराबाद येथील न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. खटला सुरू झाला सरकारपक्षाने आरोपींविरुद्ध हॅकिंगची केस मांडून 10 साक्षीदार तपासले. निनाने तिच्या कंपनीच्या सर्वरमधे वेबसाईटच्या माध्यमातून आरोपीने अधिकृतरीत्या प्रवेश करून सहा रिसर्च फाइल्स डाउनलोड केल्याची साक्ष दिली. त्यामुळे कंपनीच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीची हानी झाल्याचे तिने सांगितले. या कामी पंचनामा केलेल्या पंचांनीही त्यांच्यासमोर आरोपीकडून पेनड्राईव्ह तसेच हार्ड डिस्क, कंम्प्युटर जप्त केल्याची साक्ष दिली. त्यामुळे सरकार पक्षाच्या केसला दुजोरा मिळाला. आरोपी काम करीत असलेल्या झिरो कंपनीला सेवा पुरवित असल्याची साक्ष इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपनीच्या नोडल ऑफिसरने देऊन ,हॅकिंग करण्यात आलेला आय.पी अॅड्रेस हा आरोपीच्या संगणकाचा असल्याची महत्त्वपूर्ण बाब त्यांनी पुराव्यात सांगितली.
 झिरो कंपनीतील तीन कर्मचाऱ्यांनी आरोपी हा त्यांच्या कंपनीत मार्केट ॲनालिस्ट म्हणून काम करतो, तसेच  तपासावेळी पोलिसांनी कंपनीतील आरोपी वापरत असलेला संगणक जप्त केल्याची साक्ष दिली. फॉरेन्सिक तज्ञाने देखील आरोपीच्या ताब्यातून हस्तगत केलेल्या पेन ड्राईव्ह व हार्डडिस्कमधील 6
 ई -फाइल्स तक्रारदार कंपनीच्या वेबसाईटच्या माध्यमातून डाऊनलोड केलेल्या फाईल्स आहेत अशी साक्ष दिली. 
सरकार पक्षाने हॅक झालेल्या सहा  ई-फाईल्स व आरोपी वापरत असलेल्या संगणकाची साखळी यशस्वीरित्या कोर्टात सिद्ध केल्याने आरोपीस दोषी धरण्यात आले. शिक्षेबद्दल विचारताच आरोपी कोर्टासमोर रडू लागला.  त्याने तो उच्चशिक्षित असून कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत असल्याचे सांगून कोर्टाने सहानुभूती दाखवून केवळ दंडाची शिक्षा करावी अशी विनंती केली. परंतु तक्रारदार कंपनीच्या  मौल्यवान, मार्केट रिसर्चच्या फाइल्स आरोपीने उच्चशिक्षित व स्वतः रिसर्च ॲनालिस्ट असूनही हॅक केल्याने तो या गंभीर गून्ह्यासाठी, सहानुभूतीपात्र नाही असे मत नोंदवत कोर्टाने हॅकरला माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम 66 अन्वये दोन वर्षाच्या सश्रम तुरुंगवासाची व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com