'पुढच्या 10 वर्षांत आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करता येणार नाही' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'पुढच्या 10 वर्षांत आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करता येणार नाही'

'पुढच्या 10 वर्षांत आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करता येणार नाही'

कोल्हापूर : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पुढील दहा वर्षांतही महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करता येणार नाही. त्यांनी आघाडीचा कार्यक्रम करण्याचे व परत येण्याचे स्वप्न पाहणे सोडून द्यावे, असा टोला ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. तसेच फडणवीसांना गुजरात, गोवा आणि उत्तर प्रदेशातील टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी नेमावे, असे सांगत ना. मुश्रीफ यांनी भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा दौरा केला. पुढे महाराष्ट्रातील कोकणात आणि केरळपर्यंत गेले असते तर बरे झाले असते. पंतप्रधान हे केवळ गुजरातचे नाहीत ते देशाचे आहेत. पण, ते तसे वागताना दिसत नाहीत. ऑक्सिजन अभावी गोव्यात कोरोना रुग्णांचा मृत्यू, उत्तर प्रदेशात गंगा नदीत मृतदेह वाहत जाणे, तसेच गुजरातमधील कोरोना स्थिती भयंकर आहे. तरीही या तीन राज्यात आकड्याची लपवालपवी केली जात आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी फडणवीस यांची तेथील टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी निवड करण्याचा सल्ला मुश्रीफ यांनी दिला.

हेही वाचा: 'चिवला बीचवर मुख्यमंत्री राणेंचे घर पहायला आले होते का?'

दोन दिवसांपूर्वी चक्रीवादळावेळी समुद्रात अडकलेल्या अनेकांचा बळी गेला. याबाबत संबंधित जहाज कंपन्यावर मनुष्यवधाचा खटला दाखल करावा अशी मागणी मंत्री नवाब मलिक यांनी केली होती. यावर भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी टीका करताना मलिक यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा आरोप केला होता. याबाबत बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, अशी मागणी करताना भातखळकर यांना लाज वाटली पाहिजे. ते त्या कंपनीचे एजंट आहेत की वकील? अशी विचारणा त्यांनी केली.

देशात शरद पवारांचा अजूनही दरारा आहे. केंद्राने खताच्या दरात मोठी वाढ केली. ही दरवाढ मागे घ्या, म्हणून पवार यांनी पत्र लिहिताच एका दिवसांत दरवाढ मागे घेतली. ही दरवाढ मागे घेतल्याबद्दल केंद्रीय मंत्री गौडा यांचे आभार मानत असल्याचे सांगत त्यांनी चंद्रकांत पाटील यांनाही टोला लगावला.

खाजगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूचे ऑडिट

खाजगी दवाखान्यात करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे दिसत आहे. काही दवाखान्यात पैसे मिळवण्यासाठी धडपड सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अशा अशा दवाखान्याची फेर ऑडिट करणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: नातवाच्या मृत्यूच्या धक्क्याने आजी-आजोबांनीही घेतला अखेरचा श्वास!

जे चुकीचे असेल ते बंद

आम्ही गोकुळमध्ये कुणाचे टॅंकर बंद करण्यासाठी किंवा बदली करण्यासाठी सत्तेवर आलो नाही. जे चुकीचे असेल ते बंद होईल. कमीत कमी खर्च करून दूध उत्पादकांना चांगला दर देण्याचे नियोजन करत आहोत. लवकरच आपण व पालकमंत्री सतेज पाटील संघाला भेट देणार आहोत, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

loading image
go to top