

Hasan Mushrif Kolhapur Politics
esakal
Kolhapur ZP politics news : आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या ‘गोकुळ’पासून ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षापर्यंत जिल्ह्यातील सर्वच महत्त्वाच्या पदांवर ‘सब कुछ कागल’ असेच सूत्र मंत्री हसन मुश्रीफ यांनी कायम ठेवले. यावरून महायुतीच्या नेत्यांत नाराजी आहे. त्याचे प्रतिबिंब काल पन्हाळ्यात उमटल्याचे समजते. पण, या सर्वांची नाराजी दूर करून मुश्रीफ यांनी यात आघाडी घेतली.
जिल्हा बँकेसह जिल्हा दूध संघ, बाजार समिती, गोकुळ आणि जिल्हा परिषद ही प्रमुख सत्ता केंद्रे आहेत. या सर्व सत्ता केंद्रांच्या चाव्या ज्यांच्याकडे त्यांचे जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व असे सूत्र आहे. त्यातून एकेकाळी काँग्रेस अथवा जनसुराज्यच्या मदतीने या सत्ताकेंद्रात महत्त्वाची पदे भुषवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आणि पर्यायाने मंत्री मुश्रीफ यांनी स्वतःच्या राजकीय मुत्सद्देगिरीतून या सर्वच सत्तास्थानावर आपल्या कार्यकर्त्याला आणि त्यातही कागलमध्ये राहणाऱ्याला संधी देऊन कोल्हापूरच्या राजकारणात नव्या इतिहासाची नोंद केली आहे.
जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बँकेवर गेली अनेक वर्षे मंत्री मुश्रीफ स्वतः अध्यक्ष आहेत. त्यातून त्यांनी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात आपले कमी-अधिक प्रमाणात वर्चस्व ठेवले आहे. दुसरे सत्ताकेंद्र असलेल्या ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी त्यांचे पुत्र नविद मुश्रीफ आहेत, या माध्यमातून त्यांच्याच घरात दुसरे सत्ताकेंद्र आहे.
बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील हेही कागलचे आणि मंत्री मुश्रीफ यांच्या अतिशय जवळचे. दोन दिवसांपूर्वी सुर्यकांत पाटील यांनी नाराज होऊन राजीनाम्याची घोषणा केली असली, तरी अजून ते या पदावर आहेत. हे कमी की काय म्हणून ‘गोकुळ’च्या स्वीकृत संचालक पदावरही कागल तालुक्यातील मुश्रीफ यांचे ‘उजवे हात’ समजले जाणारे युवराज पाटील यांची वर्णी लागली आहे.
एवढी सगळी सत्तास्थाने कागल तालुक्यात असताना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसलाच पण अन्य तालुक्यात दिले जाईल, अशी शक्यता असताना पुन्हा मंत्री मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातीलच त्यांचे कार्यकर्ते असलेल्या शशिकांत खोत यांच्या पत्नी शिल्पा खोत यांना अध्यक्ष पदावर बसवून हे पदही कागलला नेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.