गोठ्यात राबणाऱ्या माता-भगिनींना सोन्याची भाऊबीज; बंटी, मुश्रीफ या दोन भावांकडून वचन

गोठ्यात राबणाऱ्या माता-भगिनींना सोन्याची भाऊबीज; बंटी, मुश्रीफ या दोन भावांकडून वचन

कागल (कोल्हापूर) : गोकुळ दूध संघाची सत्ता द्या. शेणा-मुतात राबणाऱ्या माता-भगिनींना सोन्याची भाऊबीज करू, असे प्रतिपादन ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागलमध्ये गोकुळ दूध संघ निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीच्या प्रचारात ते बोलत होते.

मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, सत्ताधारी ३, १३ आणि २३ तारखेला दूध बिले देत असल्याचे सांगत आहेत. गवळीसुद्धा दहा दिवस झाले की बिल देतो. यामध्ये तुम्ही नवीन काय केलं? तुमचा कारभार जर एवढा चोख आणि दूध उत्पादकांच्या हिताचा असेल तर मग निवडणुकीची भीती तुम्हाला का वाटते? गेली २५ ते ३० वर्षे सातत्याने गोकुळबाबत टिका व चर्चा असते. ती म्हणजे उधळपट्टी आणि प्रचंड खर्चाची. वासाचे दुध काढणे, दुधाची योग्य किंमत न देणे, मोठ्या लोकांच्याच टँकरना पाळी देणे, नोक-यांमधील वरकमाई, मुंबई व पुण्याच्या दुध विक्री एजंटकडून वरकमाई घेतात अशा अनेक तक्रारी आहेत. आता हे सगळ बंद करूया. शपथ घेवूया व परिवर्तन करूया.स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात भैया माने यांनी आघाडीच्या उमेदवारांची ओळख करून दिली. उमेदवार विश्वास नारायण पाटील व अरुण डोंगळे यांचीही भाषणे झाली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जि. प. सदस्य युवराज पाटील, प्रवीणसिंह पाटील, विजय देवणे, विश्वास पाटील, अरूण डोंगळे, शशिकांत पाटील - चुयेकर, नविद मुश्रीफ, विरेंद्र मंडलिक, बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, कागलच्या नगराध्यक्षा सौ. मानिक माळी, शिवाजी कांबळे यांच्यासह सर्वच उमेदवार व प्रमुख मान्यवर उपस्थित होते. आभार मुरगुडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी मानले.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, महादेवराव महाडिक यांना आम्ही सतत टँकर बद्दल विचारत होतो. काल त्यांनी आपले ४० टँकर असल्याची जाहीर कबुली दिली. ज्या ज्या संस्थांना त्यांचा स्पर्श झाला त्या सगळ्या संस्था बुडाल्या आहेत. त्यांच्या घशातुन दूध संघ काढून, तो सर्वसामान्य  उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीचा करण्यासाठीच आमची ही लढाई आहे.

खासदार संजय मंडलिक म्हणाले, सत्ताधारी आघाडीचे नेते गोकुळ दूध संघ स्वतःच्या खाजगी मालकीचा करायला निघाले होते. परंतु, जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या जनरेट्यामुळेच तो निर्णय मागे घ्यावा लागला. गोकुळ दूध संघाचा वाहतूक ठेकेदारच सगळं मीच केलं म्हणतोय. ही प्रवृत्ती मोडूया, असेही ते म्हणाले.

             

मी सांगत होतो तेच खरं झालं

मुश्रीफ म्हणाले, गोकुळची निवडणूक महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी एकत्र  लढवावी, अशी माझी इच्छा होती. त्यामुळे  पी. एन.  पाटील यांच्या बरोबर चर्चाही सुरू होती. त्या चर्चेमध्ये पी. एन. साहेबांना म्हणालो होतो, सत्तारूढ गटातील पॅनेलमध्ये तुमचा वरचष्मा राहणार नाही. यावर पी. एन. साहेब यांनी अतिशय आत्मविश्वासाने, आपण सांगेल तेच होईल, असे सांगितले होते. पॅनेल जाहीर झाल्यानंतर पी. एन. साहेब या पॅनेल रचनेमध्ये तुमचा वरचष्मा राहिला नाही. दुर्दैवाने, माझं खर ठरलं!      

   

जिल्ह्यातील ठराव धारकांकडून वाढता प्रतिसाद

मी गोकुळच्या सर्व सभासदांना फोन करून पॅनेल विजयी करण्याची विनंती करत आहे. गोकुळचे बहुसंख्य ठरावधारक मला सांगतात की, तुम्ही आमची कामे केली आहेत. कुठल्या गावचा, कुठल्या गटाचा जाती-धर्माचा विचार न करता तुम्ही कामे केली आहेत.  आम्हांला तुम्हांला मतदान करण्याची संधी मिळाली नव्हती, ती गोकुळमुळे मिळाली आहे. आम्ही तुम्हाला मतदान करणार. माझी कळकळीची हात जोडून विनंती की, तुम्ही सर्व पॅनलला मतदान करा. विकासाने तुमच्या गावाचा चेहरामोहरा बदलून टाकू. विरोधी पॅनलचे लोक गोकुळच्या निवडणुकीत लक्ष्मी दर्शन करतील. कारण ती लक्ष्मी आपलीच आहे. ती घ्या, परंतु परिवर्तन करा.

चोख व पारदर्शी कारभाराने संघ नावारूपाला आणू

गोकुळची सत्ता आपण दिली तर आम्ही वचन दिले आहे. गोकुळ हा दूध उत्पादकांच्या मालकीचा करु. मल्टीस्टेट करण्यापासून आपण सर्वांनी फार संघर्ष करत खाजगी होण्यापासून वाचविला आहे. हा संघर्ष वाया जाता कामा नये. लढाई पुढची आहे सत्ता द्या, परिवर्तन करा. दूध लिटरला दोन रुपये दरवाढ देऊ. पारदर्शी, चोख कारभार करू. पशुखाद्य व पशु वैद्यकीय सेवा यामध्ये प्रचंड वाढ करू. हे सर्व जर आम्ही केले नाही तर पाच वर्षांनी आम्हांला दारामध्ये उभे करून घेऊ नका. सत्ताधारी गोकुळ कसा चालवला हे सांगत आहेत ते किती खोटं बोलत आहेत. आम्हाला सत्ता देऊन बघा, दूध उत्पादक महिलांना पाच वर्ष दीपावली व भाऊबीज अशी देऊ की, भाऊराया कसे असावेत तर हसन मुश्रीफ, बंटी पाटील यांच्यासारखे असावेत असे म्हटले पाहिजे.

Edited By- Archana Banage

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com