esakal | ..तर गोकुळची निवडणूक कधीच लढणार नाही; ग्रामविकासमंत्र्यांचा कोल्हापुरात दावा

बोलून बातमी शोधा

..तर गोकुळची निवडणूक कधीच लढणार नाही; ग्रामविकासमंत्र्यांचा कोल्हापुरात दावा
..तर गोकुळची निवडणूक कधीच लढणार नाही; ग्रामविकासमंत्र्यांचा कोल्हापुरात दावा
sakal_logo
By
निवास चाैगले

कोल्हापूर : गोकुळची आमच्याकडे कधीच सत्ता नव्हती. आम्ही इतर संस्थांचा कारभार उत्तम केला आहे. एकदा गोकुळची सत्ताही सभासदांनी आमच्या हाती द्यावी. जर पाच वर्षात उत्तम पध्दतीने कारभार करुन दाखवला नाहीतर पाच वर्षांनी गोकुळची निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. तर दूध उत्पादकाला न्याय देण्यासाठीच गोकुळच्या मैदानात उतरला आहोत. गोकुळ दूध संघाचा अमुलपेक्षा चांगला ब्रॅंड करु, असा विश्‍वास व्यक्‍त करत संघाची सत्ता देण्यासाठी सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

गोकुळच्या निवडणुकीसाठी आज राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने (विरोधी) पॅनेलची घोषणा केली. यावेळी अजिंक्‍यतारा कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस ना.मुश्रीफ, ना.पाटील, ना.राजेंद्र पाटील यड्रावकर, यांच्यासह खा.संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, आमदार राजेश पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, चंद्रदीप नरके, ए.वाय.पाटील यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघ हा जिल्ह्यातील चांगला संघ आहे. त्याला आणखी चांगले करण्याची संधी सभासदांनी आम्हाला द्यावी. संघाची सत्ता आमच्याकडे कधी आलेली नाही. जिल्हा बॅंकेला मागील पाच वर्षात आम्ही देशात अव्वल स्थानी नेले आहे. अशाच पध्दतीने गोकुळला देखील अव्वल स्थानी व अमुलच्या तोडीस तोड नेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. एकदा गोकुळची सत्ता सभासदांनी आमच्या हाती द्यावी, विकास कसा करायचा असतो हे आम्ही त्यावेळी दाखवून देवू, असेही ना.मुश्रीफ यांनी सांगितले. देशभरातील चांगल्या दूध संघांचा अभ्यास करुन दुधाला 2 रुपये जादा दर देणे शक्‍य असल्याचे आमदार विनय कोरे यांनी यावेळी सांगितले.

वासाच्या दुधाचा निकाली काढणार

सध्या गोकुळ दूध संघात वासाच्या दुधाच्या नावाखाली दूध उत्पादकाची लूट होत आहे. कवडीमोल किंमतीला त्याची खरेदी होत आहे. असे प्रकार सत्ता बदलल्यानंतर बंद केले जातील. वासाचे दूध एकतर उत्पादकाला परत केले जाईल किंवा त्याला योग्य मोबदला देवून त्याचे नुकसान टाळले जाईल, असेही ना.मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच उत्पादकाला किमान 2 रुपये लिटरला भाववाढही देण्याची घोषणा ना.मुश्रीफ यांनी केली.

Edited By- Archana Banage